दिल्ली महापालिका निवडणुकीत भाजपने विजयी आघाडी घेतली आहे. दिल्ली महापालिकेतील सत्ता भाजपने कायम राखत विजयाची हॅट्रिक केली आहे. मात्र सोमवारी (२४ एप्रिल) छत्तीसगडमध्ये झालेला नक्षलवादी हल्ला आणि त्यात २५ जवानांना पत्करावे लागलेले हौतात्म्य यामुळे दिल्ली महापालिकेतील विजय साजरा न करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. दिल्ली महानगरपालिकेतील विजय भाजपने शहीद जवानांना समर्पित केला आहे.

उत्तर, पूर्व आणि दक्षिण दिल्ली महापालिकांमध्ये भाजपची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. तिन्ही महापालिकांमध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेसच्या तुलनेत भाजप खूप पुढे आहे. ‘प्रत्येकाच्या मनात सुकमामधील हल्ल्याचे दु:ख आहे. नक्षलवादी हल्ल्यात २५ जवान शहीद झाले आहेत. त्यामुळे पक्षाकडून विजय साजरा करण्यात येणार नाही. आम्ही आमचा विजय शहीद जवानांना समर्पित करतो,’ असे दिल्ली भाजपचे प्रमुख मनोज तिवारी यांनी म्हटले आहे.

दिल्ली महापालिका निवडणुकीत मतदारांनी केलेले मतदान हा अरविंद केजरीवाल यांच्या विरोधातील कौल आहे, अशी प्रतिक्रिया मनोज तिवारी यांनी निकालानंतर दिली. ‘दिल्ली महापालिका निवडणुकीच्या निकालातून केजरीवाल सरकारच्या विरोधातील नाराजी प्रकट करतील, असे आम्ही आधीपासूनच म्हणत होतो. अरविंद केजरीवाल कायमच राईट टू रिकॉलचा पुरस्कार करत आले आहेत. आता बहुधा दिल्लीकरांनीच त्यांच्या राईट टू रिकॉलचा वापर केलेला दिसतो आहे,’ असा टोलादेखील तिवारी यांनी लगावला.

दिल्ली महानगरपालिकेसाठी २३ एप्रिलला मतदान झाले. २७२ पैकी २७० जागांसाठी मतदान घेण्यात आले. दोन जागांवरील उमेदवारांचा मृत्यू झाल्याने त्या जागांसाठी मतदान घेण्यात आले नाही. आज सकाळी ८ पासून मतमोजणीला सुरुवात झाली. यामध्ये भाजपने आधीपासूनच आघाडी राखली असून आम आदमी पक्ष आणि काँग्रेसला भाजपने खूप मागे टाकले आहे. भाजपने सलग तिसऱ्यांना दिल्ली महापालिका निवडणुकीत विजय मिळवत हॅट्रिक साजरी केली आहे.