पासपोर्ट काढण्यासाठी आता जन्माचा दाखला बंधनकारक राहणार नाही. भारतीय नागरिकांसाठी पासपोर्टची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु असून जन्म तारखेचा पुरावा म्हणून या पुढे आधार किंवा पॅन कार्डही ग्राह्य धरले जाईल असे सरकारने स्पष्ट केले.

पासपोर्ट नियमावली १९८० नुसार २६ जानेवारी १९८९ रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या व्यक्तींना जन्म तारखेचा पुरावा म्हणून जन्माचा दाखला दाखवणे बंधनकारक आहे. जन्माच्या दाखल्याची एक प्रत पासपोर्टसाठीच्या अर्जासोबत जोडावी लागते. मात्र या नियमात आता बदल करण्यात आले आहे. केंद्रीय राज्यमंत्री व्ही के सिंह यांनी संसदेत नव्या नियमाविषयी माहिती दिली. पासपोर्टची प्रक्रीय सहज सोपी करण्यासाठी आता जन्म तारखेचा पुरावा म्हणून आधार किंवा पॅन कार्ड वापरता येणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व्हिस रेकॉर्ड, पेन्शन रेकॉर्डही सादर करता येईल. देशातील कोट्यवधी जनतेला पासपोर्ट काढणे सोपे व्हावे यासाठी नियमात बदल केल्याचे त्यांनी संसदेत सांगितले.

६० वर्षांवरील आणि आठ वर्षांखालील अर्जदारांना पासपोर्ट शुल्कात १० टक्क्यांची सूट दिली जाणार आहे. ऑनलाईन अर्ज करणाऱ्यांना पालकांपैकी फक्त एकाचे नाव द्यावे लागणार आहे. यामुळे सिंगल पॅरेंट्सना मोठा फायदा होणार आहे. याशिवाय घटस्फोट झालेला असल्यास त्याची प्रत किंवा दत्तक घेतल्याचे प्रमाणपत्रही पासपोर्टसाठी अर्ज करताना सादर करावे लागणार नाही. अनाथ मुलांना अनाथालयातून जन्म तारखेचा पुरावा म्हणून एक प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनाही पासपोर्टसंदर्भात एक नवीन अॅप लाँच करणार असल्याचे जाहीर केले होते. पासपोर्टसाठी अर्ज केल्यावर पोलीस पडताळणी ही महत्त्वाची प्रक्रिया असते. ही प्रक्रिया सहज सोपी करण्यासाठी अॅप तयार करण्यात आले आहे. ऑगस्टपर्यंत हे अ‍ॅप मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यांमध्ये सुरू होईल.