नोकिया ६ हा फोन १९ जानेवारी रोजी विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. जेडी डॉट कॉम या वेबसाइटवर हा फोन विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. या फोनचा फ्लॅश सेल उद्या होणार आहे. त्याच्या नोंदणीला सुरुवात झाल्याच्या २४ तासांमध्येच अडीच लाख ग्राहकांनी नोंदणी केली. हा फोन विकत घेण्याची तयारी आतापर्यंत १० लाख जणांनी दाखवली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून स्मार्टफोनच्या बाजारांमध्ये नोकियाला आपला जम बसविण्यात यश मिळाले नाही. परंतु, नोकियाच्या या नव्या फोनमुळे मोबाइलच्या दुनियेत पुन्हा जम बसविण्याची संधी त्यांना मिळाली आहे. सुरुवातीच्या काळात नोकियाचा मोबाइल क्षेत्रात दबदबा होता.

जेव्हा स्मार्टफोनचा जमाना आला त्यानंतर नोकियाची या क्षेत्रात पीछेहाट सुरू झाली होती. नंतर नोकियाने लुमिया हा फोन विंडोज या ऑपरेटिंग सिस्टमवर सुरू केला. आता नोकियाने अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टम अॅंड्रॉइड नुगटच्या सपोर्टने हा फोन बाजारात आणला आहे. त्यांच्या या फोनला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याने एचएमडी ग्लोबल कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. याआधी कंपनीने अॅंड्रॉइडवर चालणारी नोकिया एक्स सिरिज लाँच केली होती. परंतु या फोनला मिळालेल्या अल्पशा प्रतिसादामुळे नोकियाने एक्स सिरीज बंद केली.

५.५ फुल एचडी डिस्प्ले आणि २.५ डी गोरिल्ला ग्लास, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४३० एसओसी, ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज, ड्युएल सिम आणि ३,००० एमएएच बॅटरी,  फिंगरप्रिंट स्कॅनर, १६ मेगापिक्सल रिअर कॅमेरा ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, डॉल्बी अॅटमॉस ही या फोनची वैशिष्ट्ये आहेत. काळाची गरज ओळखून आम्ही ऑपरेटिंग सिस्टममध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला असे एचएमडी ग्लोबलचे मुख्याधिकारी अर्टो नुमेला यांनी म्हटले.

अद्ययावत तंत्रज्ञान आणि सौंदर्य याचा मिलाफ घडवून आम्ही या हॅंडसेटची निर्मिती केली असे ते म्हणाले. नोकिया ६ हा अतिशय सुंदर फोन असून इंटरटेनमेंट आणि डिस्प्ले फीचर्स ही त्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत असे ते म्हणाले. एचएमडी ग्लोबल ही एक फिनिश कंपनी आहे. या फोनकडे नोकिया या ब्रॅंडच्या विक्रीचे हक्क आहेत. नोकिया या ब्रॅंडला पूर्ण एक नवा लुक देण्याची योजना या फर्मने आखली आहे. येत्या काळामध्ये एकूण चार नवे हॅंडसेट लाँच केले जाणार आहेत. हे नवे फोन ५.० ते ५.७ इंच डिस्प्लेचे असतील.