ओबामाकेअर आरोग्य धोरण रद्द करण्याचा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न तूर्त तरी फसला असून, प्रशासनास त्यासाठी पाठिंबा मिळवण्यात अपयश आले आहे. परिणामी, आता या प्रश्नावर सहकारी रिपब्लिकन सदस्यांना निर्वाणीचा इशारा देण्याची वेळ ट्रम्प यांच्यावर आली आहे.

ओबामाकेअर धोरण रद्द करण्यासाठी काल रात्री मतदान होणार होते, पण अनेक रिपब्लिकन सदस्य अनुपस्थित होते, त्यामुळे आता सभापती पॉल रायन यांनी त्यावर आज मतदान घेण्याचे ठरवले आहे. कदाचित हे मतदान सोमवापर्यंत लांबणीवर जाऊ शकते. व्हाइट हाऊसचे अर्थसंकल्प संचालक मिकी मुलावनी यांनी याबाबत व्हाइट हाऊसमार्फत संदेश जारी केला आहे. मुलावनी यांनी असा इशारा दिला आहे की, नवीन कायदा संमत होऊ शकला नाही तर ट्रम्प हे इतर अग्रक्रमांना प्राधान्य देतील. उद्या यावर मतदान होईल व ओबामाकेअर रद्द करण्याचा प्रयत्न केला जाईल. काही कारणाने हा प्रस्ताव संमत झाला नाही तर ट्रम्प त्यात अडकून पडणार नाहीत, असे काँग्रेसचे न्यूयॉर्कचे सदस्य ख्रिस कॉलिन्स यांनी सांगितले. रिपब्लिकन सदस्यांशी ट्रम्प यांनी चर्चा केली व जर ओबामाकेअर रद्द करता येणे तातडीने शक्य नसेल तर ती योजना तूर्त तशीच राहू द्यावी लागेल. रिपील अ‍ॅण्ड रिप्लेस असे त्यांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे. ओबामाकेअर रद्द करण्याचे निवडणुकीतील आश्वासन पूर्ण करण्याची लोक वाट पाहत आहेत, असे व्हाइट हाऊसचे प्रसिद्धी सचिव सीन स्पायसर यांनी सांगितले. अध्यक्ष ट्रम्प यांनी वाटाघाटी व चर्चेअंतीच ओबामाकेअर रद्द करणारे विधेयक आणले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.