मोबाइल फोनपासून घरातल्या फर्निचपर्यंत तसेच कपडय़ांपासून ते चपला-बुटांपर्यंत सर्वच प्रकारच्या वस्तूंची ऑनलाइन खरेदी करण्याचा कल अलीकडे वाढीस लागला आहे. गेल्या दोन वर्षांत ऑनलाइन शॉपिंगच्या या संकल्पनेने भारतात चांगलेच बाळसे धरले असून येत्या दोन वर्षांत तर त्यात आणखी भर पडणार आहे. २०१६ मध्ये तब्बल दहा कोटी भारतीय ऑनलाइन शॉपिंगचे ग्राहक असतील, असे भाकीत केले आहे गुगलने!
वाढत्या इंटरनेटच्या प्रसाराने ऑनलाइन शॉपिंगचे वेड भारतीयांना लागले असून येत्या दोन वर्षांत त्यात आणखी वाढ होणार असल्याचे निरीक्षण गुगलने नोंदवले आहे. २०१२ मध्ये ८० लाख भारतीय ऑनलाइन शॉपिंगला प्राधान्य देणार होते. यंदा हेच प्रमाण साडेतीन कोटी इतके आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपासून ते सौंदर्यप्रसाधने, फर्निचर आदी वस्तूंची सर्रासपणे ऑनलाइन खरेदी केली जाते. अर्थात ज्यांच्याकडे इंटरनेट आहे, त्यांनाच ही खरेदी शक्य होते. याबाबतीत आतापर्यंत अमेरिका भारताच्या पुढे होती. मात्र, पुढच्याच महिन्यात भारत अमेरिकेला याहीबाबतीत मागे टाकणार असल्याचे गुगलने म्हटले आहे. सध्या ई-कॉमर्सचा भारतातील व्यवसाय तीन अब्ज डॉलर एवढा आहे. मात्र, दोन वर्षांत तो पाचपटीने वाढण्याची शक्यता आहे.
स्त्रीशक्ती अग्रेसर!
येत्या दोन वर्षांत भारतात दहा कोटी ऑनलाइन शॉपिंग ग्राहक असतील. यातील ४० टक्के ग्राहक स्त्रिया असतील. सौंदर्यप्रसाधने, त्वचेची निगा राखणारी उत्पादने, लहान मुलांची उत्पादने, घरातील सजावटीचे साहित्य, कपडे आदींचे शॉपिंग करण्यात महिलावर्ग अग्रेसर असून नजीकच्या भविष्यात त्यात आणखी वाढ होणार आहे. प्रथम श्रेणीतील शहरांमध्ये करण्यात आलेल्या पाहणीनुसार पुरुषांपेक्षा महिलाच ऑनलाइन शॉपिंगला जास्त प्राधान्य देत असल्याचे निदर्शनास आले आहे.
मोबाइलला जास्त मागणी
प्रत्येकी तीन ऑनलाइन ग्राहकांपैकी एक जण मोबाइल व इतर गॅजेट्सची जास्त खरेदी करतो. पहिल्या व दुसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये हे प्रमाण जास्त असून तरुणवर्गाचा यात मोठा हातभार आहे. तिसऱ्या श्रेणीतील शहरांमधील ग्राहकही ऑनलाइन शॉपिंगमध्ये मोबाइललाच जास्त पसंती देत असल्याचे चित्र आहे. गुगल सर्चवरही मोबाइल फोनसंदर्भातच जास्त प्रमाणात सर्च केले जाते.
विश्वासार्हता महत्त्वाची
एकंदर सहा हजार ८५९ इंटरनेट वापरकर्त्यांच्या पाहणीतून वरील निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यातील ६० टक्के लोकांनी ऑनलाइन खरेदी हा त्यांच्या प्रतिष्ठेशी निगडित झालेला मुद्दा असल्याचे नमदू केले. तर ६२ टक्के लोक असमाधानी आहेत.
२०१६ पर्यंत ऑनलाइन शॉपिंगचे प्रमाण तिपटीने वाढेल. सुमारे पाच कोटी ग्राहक पहिल्या व दुसऱ्या श्रेणीतील शहरांमधून येतील. जे सध्या ऑनलाइन शॉपिंगच्या वाटेला जात नाहीत, असे ग्राहकही याकडे वळतील. त्यामुळे नजीकच्या भविष्यात ई-कॉमर्सचा व्यवसाय भरभराटीला येईल.
– राजन आनंदन, गुगल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक