जमावाकडून अल्पसंख्यांवर होत असलेले हल्ले आणि बेदम मारहाण करून करण्यात आलेल्या हत्या यांविरोधात आता एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी मैदानात उतरले आहेत. या प्रकरणी संसदेत एक खासगी विधेयक आणणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एक चर्चेदरम्यान त्यांनी ही माहिती दिली आहे.

औवैसी म्हणाले, लवकरच हे विधेयक आम्ही लोकसभेत सादर करणार आहोत. यासाठी लोकसभा सचिवालयाला नोटीसही पाठवण्यात आली आहे. या नोटीशीला सचिवालयाने मंजूरीही दिली आहे. या विधेयकात जमावाकडून करण्यात येणारी हिंसा थांबवण्यासाठी दंडाची तरतूद करण्यात आली आहे. देशभरात कथित गोरक्षकांकडून होत असलेल्यांच्या हिंसक हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर औवैसी यांनी हे पाऊल उचलले आहे.
दरम्यान, आयोध्या प्रकरण आणि राम मंदिराबाबतच्या एका प्रश्नाला उत्तर देताना औवैसी म्हणाले, आमचे पहिल्यापासून हेच सांगणे आहे की, ज्या प्रकारे ६ डिसेंबरला बाबरी मशीद पाडण्यात आली, कायद्याची वाट लावण्यात आली असे पुन्हा होणार नाही. हा देशच नाही तर मोठी न्यायालयेही कोणालीही असे करण्याची परवानगी देणार नाही.

औवैसी म्हणाले, आता याप्रकरणी कोणतीही चर्चा होणार नाही. इतिहासात अशा प्रकारे अनेक वेळा प्रयत्न करण्यात आले. व्ही. पी. सिंह, चंद्रशेखर, देवेगौडा आणि गुजराल पंतप्रधान होते त्यावेळी या प्रश्नी चर्चेचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, यावर काहीही तोडगा निघाला नाही. यामध्ये मुसलमानांकडून अपयश आले नाही तर दुसऱ्या बाजूच्या लोकांकडूनच या चर्चा अपयशी ठरवण्यात आल्या यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.