भारतीय लष्कराच्या जवानांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतर प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत नौशेरातील भारतीय चौक्या उद्ध्वस्त केल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केला होता. त्याचा व्हिडिओही प्रसिद्ध केला होता. मात्र, पाकिस्तानचा हा खोटारडेपणा भारतीय लष्कराने उघड केला आहे. पाकिस्तानने जारी केलेला तो व्हिडिओ बोगस असल्याचे वृत्त ‘एएनआय’ने भारतीय लष्कराच्या सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

राजौरी सेक्टरमधील नौशेरातील भारतीय चौक्या उडवल्याचा दावा करणारा व्हिडिओ पाकिस्तानी लष्कराने प्रसिद्ध केला होता. पण भारतीय चौक्यांना उडवणे अशक्य असल्याचे भारतीय लष्कराच्या सूत्रांनी म्हटले आहे. भारतीय चौक्यांच्या भिंती भक्कम आहेत. त्या सहजासहजी उद्ध्वस्त करता येणार नाहीत. या व्हिडिओत स्फोट झाल्याचे दिसून येत आहे. पण केवळ आयईडी स्फोटांनीच भारतीय चौक्या उडवणे शक्य आहे. शस्त्रांस्त्रांच्या माऱ्याने हे कदापि शक्य नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. इतकेच नाही तर या व्हिडिओत अनेक ठिकाणी एडिटिंग केल्याचेही दिसते, असेही सांगण्यात आले.

दरम्यान, पाकिस्तानने जारी केलेल्या १ मिनिट २८ सेकंदाच्या या व्हिडिओत चौक्यांसारखे बांधकाम स्फोटामुळे कोसळल्याचे दिसत आहे. तसेच त्याठिकाणी धूर आणि धुळीचे लोट दिसून येत आहेत. पण हा एक प्रपोगंडा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात पाकिस्तानने स्वतःहूनच आपल्या चौक्या उद्ध्वस्त केल्याचे दिसत आहे.

दरम्यान,  भारतीय लष्कराने राजौरीतील नौशेरा सेक्टरमधील पाकिस्तानी सैन्याच्या चौक्या उद्ध्वस्त केल्याचे जाहीर केल्यापासून पाकिस्तान चवताळल्याचे दिसत आहे. भारताच्या या कारवाईमुळे चिडलेल्या पाकने बुधवारी सियाचीनमधून लढाऊ विमानाचे उड्डाण केल्याचा दावा तेथील माध्यमांनी केला होता. परंतु, भारतीय हवाईदलाने पाकचा हा दावा फेटाळला आहे. भारतीय हद्दीतून अशा कोणत्याही लढाऊ विमानाचे उड्डाण झाले नसल्याचे हवाईदलाने म्हटले आहे.