उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीयस्तरावर एकटे पडत असतानाही पाकिस्तान यापासून काही बोध घेताना दिसत नाही. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी भारताविरोधात अणुबॉम्ब वापरण्याची धमकी दिली आहे. पाकिस्तानला भारतापासून धोका वाटल्यास अणुबॉम्बचा निश्चितपणे वापर केला जाईल, अशी धमकी आसिफ यांनी पाकिस्तानमधील एका वृत्त वाहिनीशी बोलताना दिली.
आमचा देश व देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीच आम्ही सामारिक शस्त्रे विकसित केली आहेत. ही शस्त्रे शोभेची बाहुली म्हणून बनवलेले नाहीत. पण जर आमचे अस्तित्वच धोक्यात आले तर आम्ही त्यांना नेस्तनाबूत करू, असे वक्तव्य त्यांनी केले. ही मुलाखत २६ सप्टेंबर रोजी प्रसारित झाली. आसिफ यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही १७ सप्टेंबर रोजी जिओ या पाकिस्तानच्या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळीही त्यांनी भारताला अणुबॉम्बची धमकी केले होते.
दि. १८ सप्टेंबर रोजी जम्मू आणि काश्मीमधील उरी येथील लष्करी तळावर चार दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १८ जवान शहीद झाले होते. लष्कराच्या कारवाईत चारही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. हे चारही अतिरेकी हे पाकिस्तानचे असल्याचे पुरावे भारताने नुकताच पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त बासित अली यांना सुपूर्द केले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीयस्तरावर पाकिस्तानवर मोठ्याप्रमाणात टीका केली जात असून भारत कूटनीतीचा वापर करून त्यांना एकटे पाडण्याचा प्रयत्न करत आहे. भारताच्या या प्रयत्नांना काही प्रमाणात यश येताना दिसत आहे. त्यामुळे अस्वस्थ पाकिस्तानकडून अशा भाषेचा वापर केला जात असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्यात पाकिस्तानमध्ये होणारी सार्क परिषद रद्द करण्यात आली आहे.