आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला ५०६.४ दशलक्ष डॉलर्सचा कर्जाचा हप्ता मंजूर केला आहे. देशाच्या आर्थिक सुधारणा व वाढीसाठी संपुट योजनेचा भाग म्हणून ही उपाययोजना करण्यात आली आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती वाईट असून त्यांना या कर्जामुळे लाभ होणार आहे. तीन वर्षांच्या कालावधीसाठी हे कर्ज मंजूर करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी मंडळाने काल वॉशिंग्टन येथे हा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या जानेवारी ते मार्च २०१५ या काळातील आर्थिक स्थितीचा सातव्यांदा आढावा घेतल्यानंतर हे कर्ज मंजूर करण्यात आल्याचे एक्सप्रेस ट्रिब्यूनचे वृत्त आहे. त्यामुळे इस्लामाबादला पुढील आठवडय़ात कर्जाचा आठवा हप्ता दिला जाणार आहे.
सप्टेंबर २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने तीन वर्षांसाठी विस्तृत निधी सुविधा म्हणून ६.६ अब्ज डॉलर्सचा हप्ता मंजूर केला होता. नव्या कर्ज हप्त्याला मंजुरी मिळाल्याने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला दिलेली रक्कम २०१३ पासून ४.१ अब्ज डॉलर्स झाली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे लक्ष्य आतापर्यंत संख्यात्मक होते ते आता रचनात्मक सुधारणा हे आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने निव्वळ आंतरराष्ट्रीय राखीव निधीबाबत नियम बदलले आहेत. परकीय चलन साठा सोडून आता दायित्वांचा विचार केला जातो. पाकिस्तानने जानेवारी व मार्च महिन्यात सहाव्या अवलोकनात अटींची पूर्तता केली होती त्यांना आणखी कर्जमाफीची आवश्यकता भासली नव्हती. पहिल्या पाच अवलोकनात पाकिस्तानला संपुट योजना रूळावर ठेवण्यासाठी दहावेळा माफी देण्यात आली होती.