आयएसआयसाठी हेरगिरीचे रॅकेट
आयएसआयचा एक हस्तक आणि बीएसएफचा एक कर्मचारी यांच्या संगनमताने सुरू असलेल्या हेरगिरी रॅकेटच्या संदर्भात येथील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील एका कर्मचाऱ्याची भूमिका पोलीस तपासून पाहत आहेत.
पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या आशीर्वादाने हेरगिरीचे रॅकेट चालवणारा पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (पीआयओ) चा कथित सूत्रधार कैफतुल्ला खान ऊर्फ मास्टर राजा हा या रॅकेटसाठी अधिक ‘संसाधने’ जमवण्यासाठी त्याच्या पाकिस्तानातील समपदस्थाला भेटणार होता, असे सहपोलीस आयुक्त (गुन्हे) रवींद्र यादव यांनी सांगितले.
तपासादरम्यान खान याने पोलिसांना सांगितले की, त्याच्या समपदस्थाने त्याला पाकिस्तानी उच्चायुक्तालयात नोकरीला असलेल्या त्याच्या सूत्राकडून व्हिसाचे काम करून घेण्यास म्हटले होते. मात्र या ‘सूत्रा’ची ओळख अद्याप पटलेली नसल्याचे यादव म्हणाले.
आपण पीआयओच्या दुसऱ्या सूत्रधाराला भेटण्यासाठी भोपाळला जात होतो आणि तो आपल्याला व्हिसा मिळवून देणाऱ्या सूत्राबाबत माहिती देणार होता, असे खान याने पोलिसांना सांगितले. परंतु या रॅकेटसाठी युवकांची भरती करण्यासाठी जाणाऱ्या खान याला दिल्लीत अटक करण्यात आली. जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्य़ाच्या एका खेडय़ातील रहिवासी असलेल्या खान याने पोलिसांना सीमा सुरक्षा दलाच्या गुप्तचर विभागात हवालदार म्हणून नोकरीला असलेला आपला भाऊ अब्दुल रशीद याच्याबाबत सांगितल्यानंतर पोलिसांनी छापा घालून त्यालाही अटक केली.
फौजांना तैनात करण्याच्या जागा, त्यांच्या हालचाली आणि सुरक्षा दलांचे गस्ती मार्ग यासंबंधीची गुप्त व गोपनीय कागदपत्रे पोलिसांनी या दोघांजवळून जप्त केली. या दोघांवरही ‘ऑफिशियल सिक्रेट्स अ‍ॅक्ट’अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी केल्याबद्दल अटक करण्यात आलेला बीएसएफचा हवालदार अब्दुल रशीद याची दिल्लीच्या एका न्यायालयाने सोमवारी ७ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली.