पाकिस्तानमध्ये चित्रालवरुन इस्लामाबादला जाणारे प्रवासी विमान हवेलियामधील डोंगराळ प्रदेशात कोसळल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. घटनेची माहिती मिळताच बचावपथक घटनास्थळाच्या दिशेने रवाना झाले आहेत. या विमानातील सर्व ४७ प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये गायक आणि आता इस्लाम धर्मप्रचारक म्हणून काम करणा-या जुनैद जमशेद यांचाही समावेश आहे.

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचे पीके ६६१ हे विमान बुधवारी दुपारी तीन वाजता ४७ प्रवाशांना घेऊन चित्रालवरुन इस्लामाबादच्या दिशेने निघाले होते. संध्याकाळी ४ वाजून ३० मिनिटांनी विमानाचे हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. मात्र काही वेळातच हे विमान अबोटाबाद जिल्ह्यामधील हवेलियामधील डोंगराळ प्रदेशातून जात असताना हे विमान कोसळल्याचे स्पष्ट झाले. विमान का कोसळले याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. या अपघाताची चौकशी सुरु असल्याचे पीआयएने स्पष्ट केले.

विमानातील ४७ प्रवाशांचा मृत्यू झाला असून यातील ३६ जणांचे मृतदेह हाती लागले आहे. या मृतदेहांना स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. पीआयएनेे विमानातील प्रवाशांची यादी जाहीर केली असून यामध्ये जुनैद जमशेद आणि त्यांच्या पत्नीचा समावेश आहे. जुनैद जमशैद यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच ट्विटरवरुन अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार विमान ज्या ठिकाणी कोसळले तिथे भीषण आग लागलीहोती. त्यामुळे विमानातील प्रवासी वाचण्याची शक्यता कमी होती.