पाकिस्तानची दर्पोक्ती

उरीमधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला असतानाच पाकिस्तानने मंगळवारी पुन्हा एकदा वल्गना केली आहे. भारतीय सीमेवर आमचे बारकाईने लक्ष असून कोणत्याही स्थितीला सामोरे जाण्यास आम्ही तयार आहोत, अशी दर्पोक्ती पाकिस्तानने केली आहे.

पूर्वेकडील सीमेवर आमचे बारकाईने लक्ष आहे आणि कोणत्याही स्थितीचा सामना करण्यास आम्ही तयार आहोत, असे लष्कराचे प्रवक्ते लेफ्ट. जन. आसिम बाजवा यांनी पेशावर येथे सुरक्षा बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितले. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जन. राहील शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली अफगाणिस्तानच्या सीमेवरील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. सीमा व्यवस्थापनासाठी २० ठाणी उभारण्यात आली असून लष्कराने कोणती पावले उचलावीत या बाबत बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे बाजवा म्हणाले.