दी न्यूयॉर्क टाईम्सच्या लेखातील माहिती ; पश्तुन अल्पसंख्याकांना दडपण्यासाठीही मदत
आंतरराष्ट्रीय पातळीवर जिहादी शक्ती वाढण्यात पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांचा सक्रिय पाठिंबाच कारणीभूत आहे शिवाय आयसिसच्या दहशतवादी संघटनेच्या उदयातही त्यांचा वाटा आहे, असे अमेरिकेतील दी न्यूयॉर्क टाईम्स या वृत्तपत्राने म्हटले आहे.
न्यूयॉर्क टाईम्सच्या ऑपएड पानावरील लेखात तज्ज्ञांनी म्हटले आहे की, पाकिस्तानने तालिबानला हल्ल्यांसाठी मदत केल्याचे पुरावे आहेत. हा केवळ अफगाणिस्तानपुरता प्रश्न नाही तर अनेक परदेशी संघर्षांत पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांचा हात आहे. आंतरराष्ट्रीय मुजाहिद्दीन गटांना पाकिस्तानने नेहमीच पाठिंबा दिला असून तालिबान व अल कायदा यांना आश्रय दिला आहे. पश्तुन अल्पसंख्याकांना दडपण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराने इस्लामी गटांना प्रोत्साहन दिले.
अफगाणिस्तान हे पाकिस्तानला आपल्या परसदारचा देश वाटतो, भारताचा तेथे प्रभाव वाढेल याची भीती पाकिस्तानला आहे. अफगाणिस्तान हा सुन्नी इस्लामींचा देश रहावा त्यामुळे पाकिस्तान तालिबानचा वापर करून त्यांचे हेतू साध्य करीत आहे, जे दहशतवादी कारवाया करीत नाहीत त्यांच्यावर पाकिस्तान धरपकडीची कारवाई करीत आहे. अल कायदा व इतर संघटनांबाबत पाकिस्तानची अशीच भूमिका आहे असे उत्तर आफ्रिकेच्या प्रतिनिधी कॅरलोटा गॉल यांनी म्हटले आहे. अल कायदा, तालिबान व हक्कानी नेटवर्क हे तीनही दहशतवादी गट पाकिस्तानात खुलेपणाने कारवाया करीत आहेत. सिराजउद्दीन हक्कानी हा हक्कानी नेटवर्कचा म्होरक्या आहे. तो पाकिस्तानात खुलेआम फिरतो. त्याने पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयास रावळपिंडी येथे भेट दिली होती. तालिबानचा मुल्ला अख्तर महंमद मनसौर याने पाकिस्तानी लष्कराशी अनेकदा क्वेट्टा येथे चर्चा केली आहे व अल कायदाचा नेता अयामान अल जवाहिरी याला पाकिस्तानात मोकळे रान आहे. तो बलुचिस्तानात वायव्य भागात आहे, दक्षिण अफगाणिस्तानात त्याने दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू ठेवले आहे. आयसिसच्या वाढीसही पाकिस्तान जबाबदार आहे. पाकिस्तानातील मदरसा ही गुप्तचर केंद्रे असून तेथे उत्तर अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते. तेथून त्याचे लक्ष मध्य आशिया व पश्चिम चीनवर आहे. चीनच्या उगुर दहशतवाद्यांना पाकिस्तानच प्रशिक्षण देत आहे.