अमेरिकेने पाकिस्तानला मोठा आर्थिक धक्का दिला आहे. पाकिस्तानला दहशतवादाविरोधात लढण्यासाठी देण्यात येणारा निधी अमेरिकेकडून रोखण्यात आला आहे. यंदाच्या वर्षात पाकिस्तानला दहशतवाद रोखण्यासाठी निधी दिला जाणार नाही, असे पँटागॉनने म्हटले आहे. दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्कविरोधात पुरेशी कारवाई न केल्याने अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे.

सुरक्षा सचिव जिम मॅटिस यांनी अमेरिकेच्या संसदेला पाकिस्तानकडून दहशतवाद आणि दहशतवाद्यांविरोधात होणाऱ्या कारवाईची माहिती दिली. यावेळी हक्कानी नेटवर्कविरोधात पाकिस्तानकडून समाधानकारक कारवाई होत नसल्याचे मॅटिस यांनी सभागृहाला सांगितले. यानंतर पँटागॉनने पाकिस्तानला दहशवादाविरोधात लढण्यासाठी दिला जाणारा निधी रोखण्याचा निर्णय घेतला. पँटागॉनचे प्रवक्ते अॅडम स्टम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘नॅशनल डिफेन्स अथॉरायझेशन अॅक्टअंतर्गत आर्थिक वर्ष २०१६ साठी पाकिस्तान सरकारला निधी दिला जाऊ शकत नाही. कारण पाकिस्तानने हक्कानी नेटवर्क या दहशतवादी संघटनेविरोधात पुरेशी कारवाई केली नसल्याची माहिती सुरक्षा सचिवांनी दिली आहे.’ अमेरिकेन सरकारच्या या भूमिकेमुळे पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे.

पाकिस्तानला दहशतवादविरोधी लढाईसाठी देण्यात येणाऱ्या निधीबद्दलचे नियम अमेरिकेकडून अतिशय कठोर करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये या नियमांमध्ये ३ महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. अमेरिकेच्या संसदेने या तीन बदलांना मान्यता दिली आहे. या बदलांमुळे पाकिस्तानला दहशतवादाविरोधी कारवायांमध्ये समाधानकारक प्रगती करावी लागणार आहे. या अटीचे पालन न केल्यास पाकिस्तानला दहशतवादाविरोधात लढण्यासाठी दिला जाणारा निधी रोखला जाईल.

अमेरिकेन संसदेने नियमांमध्ये बदल करत पाकिस्तानसमोर काही अटी ठेवल्या आहेत. या अटी पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना देण्यात येणाऱ्या मदतीसंदर्भात आहेत. याबद्दल अमेरिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि खासदारांनी आधीही चिंता व्यक्त केली होती. पाकिस्तानला दहशतवादाविरोधात लढण्यासाठी दिल्या जाणाऱ्या निधीसंदर्भात अमेरिकेच्या कनिष्ठ सभागृहात आवाजी मतदानाने तीन सुधारणा मंजूर झाल्या. यामुळे आता सुरक्षा सचिव जिम मॅटिस यांना यापुढे पाकिस्तान दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेऊन कारवाई करत असल्याची खातरजमा करुनच निधी मंजूर करावा लागणार आहे.