परकीय चलन आणि २.५ दशलक्ष रुपये किमतीच्या २४ आयफोनची तस्करी केल्या प्रकरणी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सनच्या (पीआयए) विमानातील बहुसंख्य कर्मचाऱ्यांना सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी विमानतळावरच ताब्यात घेतले आहे.
आपल्या सहकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आल्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी धरणे धरले होते. या प्रकारामुळे रविवारी विमानतळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे मॅन्चेस्टरला जाणाऱ्या पीआयएच्या विमानाला काही तास विलंब झाला.
पीके-७५८ या विमानातील १४ पैकी कॅप्टनसह ११ कर्मचाऱ्यांनी लंडनहून प्रत्येकी एक लाख पाच हजार रुपये किमतीचे २० हून अधिक आयफोन-५एस आणले असल्याची खबर सीमाशुल्क अधिकाऱ्यांना मिळाली. सदर आरोपी हे पीआयए कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी असून त्यांनी या बाबतची योजना आखली होती.
प्रथम या कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाचे तास बदलून घेतले. त्यानंतर हे सर्व जण आयफोन खरेदी करण्यासाठी लंडनला रवाना झाले. लंडनमधून स्वस्तात खरेदी करून त्याची पाकिस्तानात दामदुप्पट भावाने विक्री करण्याची या कर्मचाऱ्यांची योजना होती.कर्मचारी संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या काही विरोधकांना ही खबर मिळाली होती आणि त्यांनी त्याची सीमाशुल्क अधिकाऱ्यांना कल्पना दिली. विमान येताच या कर्मचाऱ्यांची झडती घेण्यात आली, मात्र त्यांच्याकडे आयफोन मिळाले नाहीत. या कर्मचाऱ्यांनी ते फोन प्रवाशांकडे दिल्याचे नंतर कळले. तेव्हा प्रवाशांकडून ते हस्तगत करण्यात आले.