भारत आणि चीन यांच्यातील संबंध अधिक दृढ व्हावेत अशी भारताचीही इच्छा आहे. त्याच दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या मे महिन्यात चीनला भेट देतील, अशी माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली. स्वराज या परराष्ट्र मंत्रालयाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच चीनमध्ये दाखल झाल्या आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्याची पूर्वतयारी करण्यासाठीच आपण येथे आलो आहोत, असे स्वराज यांनी स्पष्ट केले.
 कैलास मानसरोवर यात्रेसाठी आणखी एक मार्ग खुला करून देण्याबाबत चीनशी बोलणी सुरू असल्याची माहितीही स्वराज यांनी दिली.
सुषमा स्वराज शनिवारी चीनमध्ये दाखल झाल्या. आपल्या या भेटीत त्यांनी चीनमधील भारतीय समुदायाशी संवाद साधला. ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’, ‘स्वच्छ भारत अभियान’ आणि ‘गंगा स्वच्छता’ अशा अभियानांमध्ये येथील भारतीय समुदायाने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. सत्ताबदल झाल्यानंतर मोदी सरकारतर्फे सर्वप्रथम आमंत्रित केलेल्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांचा समावेश होता. त्याची हृद्य आठवण सांगतानाच स्वराज यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांच्या भारतभेटीनंतर चीनमध्ये निर्माण झालेली नाराजीची भावना शांत करण्याचा प्रयत्न केला.
मोदी भेट आणि नवा मार्ग
चीनतर्फे कैलास मानसरोवर यात्रेसाठी नवीन मार्ग सुरू करण्यात येणार असून या मार्गामुळे यात्रेकरूंना थेट बसने तीर्थक्षेत्री जाणे शक्य होणार आहे. मे महिन्यातील पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान या बससेवेचे उद्घाटन करण्यात येईल आणि मोदी स्वत: आपल्या पहिल्याच चीन दौऱ्यात नव्या मार्गाने ही यात्रा करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
बाजारपेठ भारताला खुली करावी
भारत आणि चीन यांच्यातील व्यापारतूट वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करतानाच परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी चीनकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या.
चिनी कंपन्यांना भारतात आपला व्यवसाय वृद्धिंगत करता यावा यासाठी योग्य ती पावले उचलण्यात येतीलच; मात्र चीननेही आपली बाजारपेठ भारतीय कंपन्यांसाठी अधिक खुली करावी, अशी अपेक्षा स्वराज यांनी व्यक्त केली. रेल्वे, औद्योगिक पार्क, मेक इन इंडिया उपक्रम अशा विविध क्षेत्रांत चीनने देऊ केलेल्या सहकार्याचे स्वराज यांनी कौतुक केले.
प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची
भारत आणि चीन या दोन्ही देशांना निकट आणण्यात प्रसारमाध्यमांची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन स्वराज यांनी केले. चिनी पत्रकारांमध्ये युआन श्वांग यांची प्रेरणा आणि भारतीय पत्रकारांमध्ये कुमारजीव यांचा वारसा जागृत होणे गरजेचे असल्याची अपेक्षा स्वराज यांनी व्यक्त केली.

सीमावादावर तोडगा काढण्यास भारत वचनबद्ध
भारत-चीन सीमावादावर लवकर तोडगा काढण्यास भारत वचनबद्ध आहे, असे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी  सांगितले. त्यांची चीनची पहिलीच भेट असून त्यांनी आशिया शतकाच्या संयुक्त स्वप्नासाठी भारत-चीन संबंधांबाबत सहा कलमी रूपरेषा सादर केली. भारत-चीन माध्यम मंचाच्या कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, दोन्ही देशांनी कृतिशील दृष्टिकोन, व्यापक द्विपक्षीय संबंध, संयुक्त,प्रादेशिक व जागतिक हितांचे विलीनीकरण , सहकार्याची नवी क्षेत्रे, दूरसंचाराची व्यापकता वाढवणे या मुद्दय़ांवर भर दिला तर आशियाच्या शतकाचे स्वप्न साकार होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने युवकांच्या आशा-आकांक्षांवर भर दिला आहे. गेल्या आठ महिन्यात आमच्या देशात आधुनिकतेकडे वाटचाल करण्यासाठी अनेक घटना घडल्या आहेत. पंतप्रधान मोदी हे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना तीनदा, तर पंतप्रधान ली केक्वियांग यांना एकदा भेटले आहेत असे त्यांनी सांगितले. परराष्ट्र मंत्री वांग यी यांना मोदी सरकारने प्रथम भारत भेटीचे निमंत्रण दिले, असे सांगून त्या म्हणाल्या की, चीनबरोबरच्या संबंधांना भारत मोठे महत्त्व देतो. गेल्या काही वर्षांत शक्य नव्हते त्या पातळीवर भारत-चीन यांचे संबंध गेले आहेत; त्यात बरीच प्रगती झाली आहे. संरक्षण सहकार्य सीमेवर वाढवले जात आहे. भारत-चीन सीमा वादावर तोडगा काढण्यास आमचे सरकार वचनबद्ध आहे.

लोकांनी भाजपला दिलेले भरघोस मताधिक्य आणि एकहाती बहुमत हा आमच्यावर दाखवलेला विश्वास आहे आणि त्यामुळे लोकांच्या अपेक्षांची लवकरात लवकर पूर्तता करणे हे आमचे कर्तव्य आहे, याचे भान मला आहे.
– सुषमा स्वराज, परराष्ट्र मंत्री