बनारस हिंदू विश्वविद्यालयातील हिंसाचार व पोलीस लाठीमाराच्या घटनेवरुन अभिनेता एजाज खानने नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर विखारी टीका केली आहे. ‘नरेंद्र मोदी हे हिटलरपेक्षाही धोकादायक असून आता देशात बेटी बचाव, मोदी को हटाव असा नारा देण्याची वेळ आली आहे’, अशा शब्दात त्याने मोदींवर निशाणा साधला.

बनारसमध्ये गेल्या आठवड्यात गुरुवारी एका मुलीची मोटारसायकलवरुन आलेल्या तिघांनी विद्यापीठाच्या आवारात छेड काढली होती. संबंधितांवर कारवाई करावी यासाठी शनिवारी रात्री विद्यार्थी कुलगुरूंची भेट घेण्यासाठी जात होते. मात्र या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला आणि प्रकरण चिघळले. या घटनेवरुन अभिनेता एजाज खानने फेसबुकवरुन मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली. बनारस हिंदू विद्यापीठात माझ्या हिंदू बहिणींवर लाठीमार करण्यात आला. ज्या मुलींनी विश्वासाने मोदींना मतदान केले त्यांना पोलिसांचा मार खावा लागला. पण यावर सगळेच गप्प आहेत, असे एजाज खानने फेसबुकवर पोस्ट केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे. काँग्रेसचे नेते राज बब्बर यांनी जखमी मुलींची भेट घेण्याचा प्रयत्न केला असताना त्यांनादेखील रोखण्यात आले असा आरोप एजाजने केला.

हिंदूंच्या रक्ताचे पाणी झाले आहे, हिंदू मुलींना मारहाण केली जात असून हिंदू-मुस्लिमांनी मतभेद विसरुन एकत्र आले पाहिजे आणि या मुलींची मदत केली पाहिजे असे आवाहन त्याने केले. ‘बेटी बचाव’ हा नारा बंद करुन ‘मोदी हटाव, बेटी को बचाव’ असा नारा देण्याची वेळ आली आहे. हिटलरपेक्षा मोदी हे जास्त धोकादायक असल्याचा दावा त्याने केला.

मोदी भक्तांनो नोटाबंदीमुळे तुमच्या आईवडिलांचे किती नुकसान झाले हे विचारा, मोदी मुस्लिमविरोधक आहेत म्हणून त्यांना पाठिंबा देऊ नका. मुस्लिम हे म्हातारपणासारखे असून एकदा आले की ते परत जात नाही. मी हिंदूचा द्वेष करत नाही पण धर्माच्या आधारे देशाचे विभाजन करणाऱ्यांचा मी विरोध करतो असे त्याने म्हटले आहे.

नरेंद्र मोदी हे वाराणसीमध्ये गेले. पण त्यांनी जखमी मुलींची भेट का घेतली नाही. मदरशांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातात, मग बनारस हिंदू विद्यापीठात कॅमेरे का नाहीत असा सवालही त्यांनी भाजप सरकारला विचारला.