काही दिवसांपूर्वी अमेठीत राहुल गांधी बेपत्ता अशा आशयाचे पोस्टर्स लागले होते. त्यावेळी मोठी खळबळ उडाली होती. आता अगदी असाच प्रकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत घडला आहे. वाराणसी या लोकसभा मतदारसंघात मोदी हे बेपत्ता असल्याचे पोस्टर लावण्यात आले आहेत. हे पोस्टर कोण लावले आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही. लाचार, हताश काशीवासियांकडून हे पोस्टर लावण्यात आल्याचे त्यावर लिहिण्यात आले आहे. आता पोस्टर लावणाऱ्यांचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही पडताळून पाहिले जात आहेत. खुद्द पंतप्रधानांच्या मतदारसंघात असा प्रकार घडल्यामुळे स्थानिक भाजप नेत्यांचेही धाबे दणाणले आहे.

‘जाने वह कौन सा देस जहां तुम चले गए’, असे लिहिलेल्या पोस्टरवर मोदींचे छायाचित्र आहे. वाराणसीत यांना मत मागताना शेवटचे पाहिले होते. तेव्हापासून ते बेपत्ता आहेत. ते बेपत्ता असल्यामुळे नाईलाजाने गुन्हा दाखल करावा लागत आहे, असे या पोस्टरवर लिहिले आहे.

या पोस्टरमुळे मात्र प्रशासन चांगलेच कामाला लागले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, विविध केंद्रीय मंत्री सातत्याने वाराणसी मतदारसंघाबाबत बोलताना दिसतात. त्याचदरम्यान अशा प्रकारचे पोस्टर लावल्याचे समोर आल्याने भाजप नेत्यांनाही धक्का बसला आहे.

एखाद्या नेत्याविरोधात असे पोस्टर लावण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे बेपत्ता असल्याचे पोस्टर लावण्यात आले होते. दरम्यान, या पोस्टरमुळे आता राजकीय क्षेत्रातून यावर प्रतिक्रिया येऊ शकतात. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठी मतदारसंघातही अशाच प्रकारचे पोस्टर्स लावण्यात आले होते. त्यावेळीही मोठा गदारोळ झाला होता.