छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे २६ जवान शहीद झाले आहेत. आणखी काही जवान या हल्ल्यात जखमी झाले असून यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नक्षलवाद्यांच्या हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे.

‘नक्षलवाद्यांकडून करण्यात आलेला भ्याड हल्ला अतिशय खेदजनक आहे. संपूर्ण परिस्थितीवर सरकार लक्ष ठेऊन आहे. शूर जवानांचा अभिमान वाटतो. जवानांचे हौतात्म्य वाया जाणार नाही. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत,’ अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. छत्तीसगडमधील हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी, अशी आशादेखील पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा कठोर शब्दांमध्ये निषेध केला आहे. ‘केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनर हल्ला झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी शहीदांना अभिवादन करतो. मी शहिदांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे,’ असे ट्विट राजनाथ सिंह यांनी केले आहे. गृहराज्यमंत्री हंसराज अहिर छत्तीसगडला रवाना झाल्याची आणि या संपूर्ण हल्ल्यावर लक्ष ठेवून असल्याची माहितीदेखील राजनाथ सिंह यांनी ट्विटरवरुन दिली.

केंद्रीय शहर विकास आणि माहिती प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनीदेखील छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्याचा निषेध केला. ‘शूर सैनिकांना गमावल्यामुळे अतिशय वेदना होत आहेत. सैनिकांचे हौतात्म्य वाया जाणार नाही,’ असे नायडू यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील नक्षलवादी हल्ल्याचा कठोर शब्दांमध्ये निषेध करत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे.