जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात एका विशेष पोलिस अधिकाऱ्याची राहत्या घरी दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली.

हलीम गुज्जर असे या मृत्यू झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. पुलवामा जिल्ह्यातील गुटरू गावातील गुज्जर यांच्या राहत्या घरात काही दहशतवादी जबरदस्ती घुसले आणि त्यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या. यामध्ये त्यांचा जागीत मृत्यू झाला. विशेष पोलीस अधिकारी असलेल्या गुज्जर यांच्यावर जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांविरोधात कारवाईचे विशेष काम सोपवण्यात आले होते. त्यामुळेच दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केल्याचे बोलले जात आहे.

दोन दिवसांपूर्वी सोपिअन जिल्ह्यातील रमझान शेख नामक एका माजी सरपंचाची देखील दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. तीन दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. यामध्ये शौकत नावाचा एक दहशतवादी देखील मारला गेला होता. जम्मू-काश्मीरचे डीजीपी एस. पी. वैद्य यांनी ट्विटरद्वारे माहिती देताना सांगितले.

राज्यातील नागरिकांवर दहशतवाद्यांकडून हल्ल्याचे प्रमाणही या भागात वाढले आहे. त्यामुळे राजकारण्यांकडून येथे शांतता नांदावी यासाठी करण्यात येणारे प्रयत्न हाणून पाडले जात आहेत. गेल्या अनेक महिन्यांत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत.