केंद्रीय उर्जामंत्री पियूष गोयल यांची उत्तर प्रदेशातील घौसाबाद येथे पत्रकार परिषद सुरू असतानाच वीज गूल झाली. यामुळे संतापलेल्या गोयल यांनी अखिलेश यादव सरकारवर ‘अंधारातून’च निशाणा साधला. वीज तब्बल पाऊण तास गायब होती. अखिलेश यादव यांचे सरकार वीज वितरणात भेदभाव करत असल्याचा आरोप पियूष गोयल यांनी केला.

भाजपच्या मीडिया सेंटरमध्ये पियूष गोयल यांची पत्रकार परिषद सुरू होती. त्याचवेळी अचानक वीजपुरवठा खंडीत झाला. तब्बल पाऊण तास वीज गायब होती. त्यामुळे पियूष गोयल यांनी संताप व्यक्त केला. त्यांना अखिलेश सरकारविरोधात आयताच मुद्दा मिळाला. वीज वितरणात अखिलेश यादव यांचे सरकार भेदभाव करत आहे, असा हल्ला त्यांनी चढवला. अखिलेश यादव सरकारने जाती-धर्माच्या आधारावर वीज जोडणी दिली आहे, असा आरोप त्यांनी केला. मुरादाबादमधील खासदार सर्वेश कुमार यांच्या तक्रारीचे उदाहरण त्यांनी दिले. आठ गावांमध्ये चौकशी केल्यानंतर ही बाब समोर आल्याचे पियूष गोयल यांनी सांगितले.

उत्तर प्रदेश निवडणुकीत अखिलेश सरकारविरोधात वीजेचा आयताच मुद्दा मिळाल्यानंतर त्यांनी ट्विटरवरूनही निशाणा साधला. गंगा मातेची शपथ आहे. आज वाराणसीमध्ये पत्रकार परिषदेदरम्यान वीजपुरवठा खंडीत झाल्याने समाजवादी पक्षाकडून केल्या जाणाऱ्या पोकळ दाव्यांची पोलखोल झाली आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. २२ ते २४ फेब्रुवारीदरम्यान शिवपूर परिसरात तब्बल ५२ वेळा वीजपुरवठा खंडीत झाला आहे. दुसरीकडे राज्यातील इतर भागांतही वीजकपात होत असल्याने तेथील जनता त्रस्त झाली आहे, असे पियूष गोयल यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनेनुसार १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत देशातील सर्व शहरे, गावांमध्ये २४ तास वीज असेल. यासंबंधीच्या मसुद्यावर सर्व राज्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. केवळ उत्तर प्रदेश सरकारने या मसुद्यावर स्वाक्षरी केलेली नाही, असे सांगून त्यांनी अखिलेश यादव सरकारवर टीका केली. अखिलेश यादव यांचे सरकारला येथील जनता आणि शेतकऱ्यांना वीजेची सुविधा पुरवायची नाही, असा आरोपही त्यांनी केला. यावेळी वीजेसंदर्भातील आकडेवारीच गोयल यांनी जाहीर केली. मायावती यांच्या बसप सरकारने आपल्या अखेरच्या तीन वर्षांत केवळ ७९ गावांमध्ये वीज पोहोचवली. तर अखिलेश सरकारने आपल्या अखेरच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात केवळ ६२ गावांमध्ये वीजपुरवठा सुरू केला. केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर वीजपुरवठ्यासंबंधी मुद्द्यावर अधिक भर देण्यात आला आहे. २०१५-१६ या वर्षात मोदी सरकारने १३०५ गावांमध्ये वीज पोहोचवली, अशी माहिती गोयल यांनी दिली.