विमानातील इंजिनमध्ये बिघाडाच्या घटना वाढल्याने इंडिगो एअरलाईन्सच्या अडचणी वाढल्या आहेत. प्रॅट अँड व्हिटनी (पीडब्ल्यू) इंजिनमधील बिघाडाच्या पार्श्वभूमीवर इंडिगोने ८४ विमान सेवा रद्द केल्या असून १३ ‘ए ३२० नीओ’ या प्रकारातील विमानं जमिनीवर आले आहे.

‘इंडिगो एअरलाईन्स’मधील विमानांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी इंडिगोचे अहमदाबादवरुन कोलकात्याला जाणाऱ्या विमानाचे नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले होते. विमानाच्या दोन पैकी एक इंजिन फेल झाले होते. पीडब्ल्यू इंजिन असलेल्या सुमारे २० विमानांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना घडल्या असून या घटनांची हवाई वाहतूक महासंचालनालयानेही दखल घेतली आहे.

इंडिगोच्या ताफ्यात पीडब्ल्यू इंजिन असलेल्या १३ ‘ए ३२० नीओ’ या विमानांचे उड्डाण थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ८४ विमानसेवा रद्द करण्यात आल्या आहेत. कोणत्या मार्गांवरील सेवा रद्द करण्यात आल्या आहेत, या या मार्गावर आधीच बुकिंग केलेल्या प्रवाशांना कंपनीतर्फे काय पर्याय दिला जाईल हे अद्याप अस्पष्ट आहे.