राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. रामनाथ कोविंद यांनी संसदेत राष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपने एनडीएतील घटक पक्षांसह जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहादेखील उपस्थित होते. रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारीला समर्थन देणारे एनडीएतील अनेक पक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी गैरहजर होते.

रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील विजय निश्चित मानला जातो आहे. ‘देशाचे संविधान माझ्यासाठी सर्वोच्च आहे. मला पाठिंबा देणाऱ्यांचे मी आभार मानतो. देशाची सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे. मी जेव्हापासून राज्यपाल झालो आहे, तेव्हापासून मी कोणत्याही पक्षाचा नाही. राष्ट्रपती पद आणि राजकारणाचा कोणताही संबंध असू नये,’ असे रामनाथ कोविंद राष्ट्रपतीपदाचा अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले.

रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पंतप्रधान मोदी पहिले सूचक होते. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह, आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री मनेका गांधी उपस्थित होत्या.

भाजपप्रणित एनडीएसोबतच संयुक्त जनता दल, बिजू जनता दल या पक्षांनीदेखील कोविंद यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे रामनाथ कोविंद यांना ६१ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. एकट्या भाजपकडे ४८.६ टक्के मते आहेत. त्यामुळे रामनाथ कोविंद यांचा विजय निश्चित आहे. रामनाथ कोविंद उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी तमिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीसामी, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि ओडिशाचे मंत्री सूर्य नारायण पात्रो उपस्थित होते.