शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल केल्यानंतर रामनाथ कोविंद यांची भावना

पक्षीय राजकारणाच्या पलीकडे राष्ट्रपतिपदाची प्रतिष्ठा आहे ती राखली जाईल असे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी ७१ वर्षीय कोविंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व रालोआच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रपतिपदासाठी अर्ज दाखल केला.

रामथान कोविंद यांच्या विरोधात लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीरा कुमार यांना विरोधकांनी रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे दोन दलित नेत्यांमध्ये ही लढत होणार आहे. कोविंद यांना ६० टक्के मतदारांचा पाठिंबा असल्याने देशाचे १४वे राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड ही औपचारिकता आहे. १७ जुलै रोजी ही निवडणूक होणार आहे. प्रणब मुखर्जी यांची मुदत २४ जुलैला संपत आहे. कोविंद यांनी अर्ज भरताना गोव्याचे मनोहर पर्रिकर वगळता इतर भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. तसेच मित्र पक्षांपैकी जम्मू व काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती गैरहजर होत्या. बिगर भाजप मुख्यमंत्र्यांपैकी तेलंगणाचे चंद्रशेखर राव, तामिळनाडूचे ई. पलानीस्वामी हजर होते.

बिहारच्या राज्यपालपदी निवड झाल्यानंतर मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही असे कोविंद यांनी स्पष्ट केले. देशाच्या सुरक्षेचा संदर्भ देत, राष्ट्रपती हे तिन्ही दलाचे प्रमुख असतात. त्यामुळे देशाच्या सुरक्षेला प्राधान्य राहील असे कोविंद यांनी अर्ज दाखल केल्यानंतर सांगितले. दोन वेळा भाजपचे राज्यसभा सदस्य राहिलेले कोविंद यांनी भाजपच्या अनुसूचित मोर्चाचे अध्यक्षपदही भूषवले आहे.

शिवसेना गैरहजर

कोविंद यांच्या अर्जावर शिवसेनेच्या नेत्यांनी सूचक म्हणून स्वाक्षऱ्या केल्या असल्या तरी अर्ज दाखल करताना त्यांचे नेते गैरहजर होते. भाजपने निमंत्रण दिले नाही असा आरोप त्यांनी केला. भाजपने विसंवादातून हे घडल्याचे सांगितले. अर्ज दाखल करताना २८ पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते असा दावा भाजपच्या सूत्रांनी केला आहे.

लालूंचे नितीशना पुन्हा आवाहन

पाटणा : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत नितीशकुमार यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन ऐतिहासिक घोडचूक करू नये आवाहन राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी केले आहे. विरोधकांच्या उमेदवार मीरा कुमार यांचे वर्णन त्यांनी बिहारची कन्या असे केले. संघमुक्त भारताकडे आम्ही वाटचाल करत असताना नितीशकुमार यांनी संघाच्या रामनाथ कोविंद यांना पाठिंबा कसा दिला, असा सवाल लालूंनी केला. नितीशकुमार यांच्या या निर्णयाचा बिहार सरकारवर परिणाम होणार नाही असा विश्वास लालूंनी व्यक्त केला.

‘राष्ट्रपतिपद निवडणूक विचारधारांची लढाई’

विचारधारेच्या आधारावर राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे विरोधकांच्या उमेदवार मीरा कुमार यांनी स्पष्ट केले. सामाजिक न्याय व सर्वसमावेशकतेच्या आधारावर मतदारांनी निवड करावी, अशी आवाहन मीरा कुमार यांनी केले.

धर्मनिरपेक्ष पक्षांसाठी मीरा कुमार या सर्वोत्तम उमेदवार आहेत, असे ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले. धर्मनिरपेक्ष विचारांशी बांधील असणाऱ्यांनी मीरा कुमार यांना साथ द्यावी, असे आवाहन आझाद यांनी केले. विरोधकांकडे जरी संख्याबळ नसले तरी ही निवडणूक गांभीर्याने लढवली पाहिजे, अशी भूमिका भाकपचे नेते डी. राजा यांनी व्यक्त केले.