उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये सत्ता मिळवणाऱ्या भाजपविरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्याचे चित्र आज, शुक्रवारी पाहायला मिळाले. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीनिमित्त काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीला अनेक प्रादेशिक पक्षांचे नेते आणि प्रतिनिधींनी हजेरी लावली. प्रादेशिक राजकारणात एकमेकांचे स्पर्धक मानल्या जाणाऱ्या पक्षांना एकाच व्यासपीठावर आणण्याचे सोनियांचे प्रयत्न यशस्वी ठरल्याचे मानले जात आहे. उत्तर प्रदेशातून बसप प्रमुख मायावती, समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सीताराम येचुरी यांच्यासह अन्य डावे नेते एकत्र आले होते. विरोधी पक्षांच्या या एकजुटीला आता राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

सोनिया यांनी बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रीय जनता दल, संयुक्त जनता दल, समाजवादी पक्ष, बसप, तृणमूल काँग्रेस, जेएमएम, केरळ काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, राष्ट्रवादी काँग्रेस, डीएमके, एआययूडीएफ, आरएसपी, ऑल इंडिया मुस्लिम लीग, सीपीएम, सीपीआय, जेडीएस आदी पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. विशेष म्हणजे या बैठकीचे आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याऐवजी जेडीयूचे अध्यक्ष शरद यादव उपस्थित होते. भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या भोवऱ्यात सापडलेले लालूप्रसाद यादव यांच्या उपस्थितीमुळे नितीशकुमार अनुपस्थित राहिले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. मात्र, जेडीयूचे नेते पवन शर्मा यांनी त्यावर स्पष्टीकरण देत या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

काँग्रेसकडून सोनिया गांधी यांच्यासह माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, ए. के. अॅँटनी, गुलाम नबी आझाद आदी उपस्थित होते. तर सीपीएमकडून से. पी. करुणाकरन, सीपीआयकडून डी. राजा, एआययूडीएफतर्फे बदरुद्दीन अजमल, केरळ काँग्रेसच्या वतीने जोस के. मनी, जेएमएमतर्फे राज्यसभा खासदार संजीव कुमार, आरजेडीकडून लालूप्रसाद यादव, डीएमकेकडून कनिमोळी, नॅशनल कॉन्फरन्सकडून उमर अब्दुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शरद पवार, जेडीयूच्या वतीने शरद यादव, के. सी. त्यागी आदी नेते या बैठकीला उपस्थित होते.