पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवारी) युरोप दौऱ्याला सुरुवात केली असून ते या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. या दौऱ्यामध्ये मोदी युरोपमधील ४ देशांना भेट देणार असून, यामध्ये जर्मनी, स्पेन, रशिया आणि फ्रान्स या देशांचा समावेश आहे. दौऱ्यामध्ये ते अर्थिक, सुरक्षा, विज्ञान, उद्योगधंदे आणि आण्विक क्षेत्राबाबत संबंधित देशांतील वरिष्ठांशी चर्चा कऱणार आहेत. याबरोबरच युरोपीय देश आणि भारत यांच्यात मुक्त व्यापाराचा करार, दहशतवादविरोधी लढाई हे विषयही चर्चेचा मुख्य अजेंडा असतील.

आतापर्यंत भारताच्या एकाही पंतप्रधानांनी मागील ३० वर्षांत स्पेनचा दौरा केलेला नाही. त्यामुळे गेल्या ३० वर्षांत स्पेनला प्रवास करणारे पंतप्रधान मोदी हे देशातील पहिले पंतप्रधान ठरणार आहेत. या दौऱ्यादरम्यान रशियामध्ये होणाऱ्या वार्षिक व्दिपक्षीय शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर फ्रान्सला जाऊन तेथील नवनिर्वाचित राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांची भेट घेतील.

युरोप दौऱ्यात मोदी पहिल्यांदा बर्लिन येथे जाणार असून मंगळवारी ते एंजेला मर्केल यांच्यासोबत व्दिवार्षिक संघटनात्मक चर्चेचे अध्यक्षस्थान भूषवतील. भारत आणि जर्मनी या दोन देशांमध्ये उर्जा, पायाभूत सोयीसुविधा आणि दहशतवाद यांसारख्या जवळपास २५ हून अधिक विषयांवर चर्चा करण्यात येईल.

जर्मनीचे भारतातील राजदूत मार्टिन यांच्या म्हणण्यानुसार, २०१५ मध्ये झालेल्या बैठकीत या दोन देशांमध्ये अनेक विषयांत विचारविनिमय झाला होता. पुढील दिवशी पंतप्रधान सेंट पीटर्सबर्ग येथे आयोजित कऱण्यात आलेल्या व्यापार संमेलनात सहभागी होतील. इंडो – जर्मन चेंबर ऑफ कॉमर्स हे जर्मनीतील सर्वात मोठे व्दिपक्षीय उद्योग मंडळ असून त्यांच्यातर्फे या संमेलनाचे आयोजन कऱण्यात आले आहे. यामध्ये भारत आणि जर्मनी येथील ७ हजारहून अधिक कंपन्या समाविष्ट असून त्यात अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा कऱण्यात येईल.

युरोपिय संघात भारत हा जर्मनीचा सगळ्यात मोठा व्यापारी साथीदार असल्याचे विदेशी मंत्रालयाचे संयुक्त सचिव रणधीर जयस्वाल यांनी पंतप्रधानांच्या नुकतेच सांगितले होते. ३१ मे रोजी पंतप्रधान स्पेनवरुन रशियाला रवाना होणार असून, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत १८ व्या वार्षिक व्दिपक्षीय शिखर परिषदेत सहभागी होतील.