भारतीय वैज्ञानिक सोहिनी चक्रबोर्ती यांच्या नेतृत्वाखाली संशोधन
भारतीय वैज्ञानिक जगदीशचंद्र बोस यांनी वनस्पतींना संवेदना असतात हे दाखवून दिले होते पण वनस्पतींना स्मृतीही असतात, हे अलिकडच्या काळात स्पष्ट झाले आहे. वनस्पतींमध्ये या स्मृती कशा तयार होतात, याचा शोध एका भारतीय वैज्ञानिक महिलेने घेतला आहे. त्यांच्या मते यीस्ट, कीटक व सस्तन प्राण्यात आढळणाऱ्या प्रायॉन्स सारख्याच प्रथिनांमुळे वनस्पतीतही स्मृती तयार होतात म्हणजे त्यासारखीच प्रथिने वनस्पतीत असतात. सोहिनी चक्रबोर्ती यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन मोहरी प्रजातीच्या वनस्पतीतील २० हजार प्रथिनांवर करण्यात आले. त्यात एक प्रथिन प्रायॉनसारखी वर्तणूक करते असे दिसून आले. या वनस्पतीत रेणवीय पद्धतीने स्मृती जतन करण्यात येतात. फुलोऱ्यापूर्वी जेव्हा एखादी वनस्पती थंड काळात असतात, तेव्हा हा स्मृतींचा परिणाम अभ्यासण्यात आला. प्रायॉन्ससारखी ही प्रथिने असतात. आकार बदलतात व इतर रेणू या प्रथिनात समाविष्ट होत असतात, त्यामुळे आकारात बदल होतो. १९८० मध्ये प्रायॉन्सचे अस्तित्व प्रथम फळमाश्या व उंदरात आढळले. त्यानंतर स्मृती जतन करण्यासाठी या प्रथिनांची गरज असते हे पाच वर्षांनी स्पष्ट झाले.
वनस्पती या प्रथिनाच्या आवृत्त्या तयार करतात व त्यातून त्यांची स्मृती घडते असे चक्रबोर्ती यांचे म्हणणे आहे. त्यांनी अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतील व्हाइटहेड इन्स्टिटय़ूट फॉर बायोमेडिकल रीसर्च या संस्थेतील विद्यार्थिनी सुसान लिडक्विस्ट यांना मदतीस घेऊन हे संशोधन केले आहे. वनस्पतींना दुष्काळ, उष्णता व थंडी यांच्या स्मृती असतात हे काही दशकात स्पष्ट झाले आहे. हिवाळ्यातील एक रात्र व पूर्ण हिवाळा यात वनस्पती फरक करू शकतात, असे चक्रबोर्ती यांचे मत आहे. त्या दिल्ली विद्यापीठात वनस्पती जीवशास्त्र शिकल्या असून नंतर ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठातून पीएच.डी. केली आहे. त्या व त्यांच्या विद्यार्थ्यांनी वनस्पतींच्या प्रथिनांचा डाटाबेस घेऊन अभ्यास केला. त्यात तीन प्रथिनांत प्रायॉनसारखे गुणधर्म आढळून आले आहेत. हीच प्रथिने फुलोऱ्यास कारण असतात व त्यांच्यामुळे वनस्पतीत रेणवीय पातळीवर स्मृती तयार होतात. ज्या वनस्पतींना स्मृती असते, त्या वेगळ्या प्रेरक संदेशाला पूर्वीपेक्षा वेगळा प्रतिसाद देतात असे कॅन केयाटेकिन यांनी सांगितले. यूएस जर्नल ऑफ प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस या माहितीपत्रिकेत हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. माणूस व प्राण्यांमध्ये जे मेंदूरोग असतात, ते प्रायॅन्सशी निगडित असतात, हे यापूर्वी दिसून आले आहे. प्रायॉन्ससारखी प्रथिने स्मृतीस मदत करतात असे मेंदूवैज्ञानिक एरिक कँडेल व भारतीय वंशाचे वैज्ञानिक कौशिक यांनी यापूर्वी सांगितले होते. मेंदूत न्यूरॉन्सच्या जोडण्यांमुळे स्मृती असतात पण त्या प्रदीर्घ काळ टिकून राहण्यास प्रायॉन्स नावाची प्रथिने कारण असतात. वनस्पतीतील प्रायॉन्समुळे अनेक कोडी उलगडतील, असे बंगलोरच्या नॅशनल सेंटर फॉर बायॉलॉजिकल सायन्सेस या संस्थेचे वैज्ञानिक रणबीर दास यांनी सांगितले. याच संस्थेचे जयंत उदगावकर यांनी सांगितले, की वनस्पतीतील प्रायॉन्ससारखी प्रथिने महत्त्वाची असून त्यांचा फुलोऱ्यात मोठा सहभाग असतो. बाह्य़ वातावरणाला वनस्पतींचा प्रतिसाद त्यावर अवलंबून असतो.