रेल्वे मंत्रालयाची माहिती; मुंबई- अहमदाबाद आराखडय़ात कोणताही बदल नसल्याचे स्पष्ट

मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात कोणताही बदल प्रस्तावित नाही. त्यामुळे ती मुंबईऐवजी पुण्यापासून चालू होण्याचा आणि नाशिकमाग्रे अहमदाबादला नेण्याचा प्रश्नच उदभवत नसल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले. मात्र, मुंबई- नाशिक- नागपूर या मार्गावर अतिवेगवान कॉरिडॉर (हायस्पीड कॉरिडॉर) करण्याबाबत अभ्यास चालू असल्याचेही रेल्वेने नमूद केले.

५०८ किलोमीटर लांबीच्या मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचा केवळ सव्वाशे किलोमीटरचा हिस्सा महाराष्ट्रात आहे आणि बारापकी फक्त चारच स्थानके (बीकेसी- मुंबई, ठाणे, विरार आणि बोईसर) महाराष्ट्रात असताना प्रकल्प खर्चातील हिस्सा मात्र गुजरातएवढाच (प्रत्येकी पंचवीस टक्के) सोसावा लागणार असल्याने या प्रकल्पाच्या मार्गातील अडथळे दूर करण्याबाबत महाराष्ट्र सरकारकडून आढेवेढे घेतल्याचे सांगितले जाते. त्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्राचे ’नुकसान’ भरून काढण्यासाठी मुंबई- अहमदाबादऐवजी ’पुणे-मुंबई- नाशिक- अहमदाबाद’ असा सुधारित प्रकल्प मार्ग केला जाणार असल्याची चर्चा चालू आहे. रेल्वे मंत्रालयाचे मुख्य प्रवक्ते अनिलकुमार सक्सेना यांनी स्पष्टपणे त्याचे खंडन केले. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही. “तांत्रिक बाबींचा अभ्यास चालू आहे,” एवढीच मोघम टिप्पणी त्यांनी केली.

’बुलेट ट्रेनचा प्रस्ताव आता खूप पुढे गेला आहे. या प्रकल्पाला वित्त पुरवठा करण्यासाठी जपान सरकारबरोबरही करार झालेला आहे. अशास्थितीत त्यात कोणताही बदल प्रस्तावित नसल्याने बुलेट ट्रेन पुण्यापासून चालू करून नाशिकमाग्रे नेण्याचा प्रश्नच येत नाही. पण मुंबई- दिल्ली, मुंबई-चेन्नई, दिल्ली- कोलकाता, दिल्ली- नागपूर यांच्याबरोबरच मुंबई-नागपूर मार्गाचा प्रस्तावित अतिवेगवान कॉरिडॉरमध्ये समावेश केला आहे. हा कॉरिडॉर मात्र नाशिकमाग्रे जावू शकतो,’ असे सक्सेना यांनी सांगितले.

मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील (बीकेसी) प्रस्तावित टर्मिनसपासून बुलेट ट्रेन धावणे अपेक्षित आहे. पण त्यासाठी ’बीकेसी’तील 0.9 हेक्टर जागा भूपृष्ठावर तर सुमारे साडेचार एकर भूमिगत जागा लागणार आहे. याच परिसरात मुंबई आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र बनविले जाणार असल्याने बुलेट ट्रेनला जागा देण्यावरून रेल्वे आणि मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणामध्ये (एमएमआरडीए) सध्या रस्सीखेच चालू आहे.

असा आहे बुलेट ट्रेनचा प्रस्ताव..

  • एकूण लांबी ५०८ किलोमीटर. बोगद्यांचा अपवादवगळता संपूर्ण मार्ग ’इलेव्हेटेड’ स्वरूपाचा. बीकेसी, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सुरत, भडोच, बडोदा, आण ंद, अहमदाबाद आणि साबरमती अशी बारा स्थानके असतील.
  • कमाल वेग प्रतितास ३५० किलोमीटर असेल. ५०८ किमीचे अंतर अवघ्या २ तास ७ मिनिटांत पूर्ण करेल. पण सर्व बारा स्थानकांवर थांबल्यास २ तास ५८ मिनिटे लागतील.
  • एकूण खर्च ९७,६३६ कोटी रूपये. त्यापकी जपान सरकारच्या ’जायका’ या संस्थेकडून ७९,१६५ कोटींचे कर्ज. व्याजदर फक्त ०.१ टक्के. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पंधरा वर्षांनी परतफेड चालू होईल आणि ती ३५ वष्रे चालेल. थोडक्यात परतफेडीचा कालावधी पन्नास वर्षांचा आहे.
  • २०२३-२४ पर्यंत प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ठ आहे. ते साध्य केल्यास २०४०0पासून परतफेड चालू होईल आणि तेव्हा मासिक हफ्ता असेल दोनशे कोटी रूपयांदरम्यान.
  • उरलेल्या रकमेपकी (१८,४७१ कोटी रूपये) केंद्र निम्मा हिस्सा उचलेल आणि महाराष्ट्र व गुजरातला प्रत्येकी पंचवीस टक्के भार सोसावा लागेल. त्यानुसार महाराष्ट्राला साडेचार हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम या प्रकल्पाला द्यावी लागेल.

(स्त्रोत : रेल्वेच्या संसदीय स्थायी समितीसमोर केलेल्या सादरीकरणातून)