बालगुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना, पंजाबमधील लुधियानात अंगावर शहारे आणणारी धक्कादायक घटना घडली आहे. एका १६ वर्षांच्या मुलाने मांस खाण्यासाठी नऊ वर्षांच्या मुलाची निर्दयी हत्या केली आहे. या मुलाची हत्या करून त्याने त्याचे सहा तुकडे केले. इतकेच नाही तर त्याचे मांस खाऊन रक्तही प्यायल्याचे उघडकीस आले आहे. सीसीटिव्ही कॅमेऱ्यातील चित्रणामुळे त्याचे हे क्रौर्य समोर आले असून, पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

दीपू कुमार असे हत्या झालेल्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. दीपू सोमवारी बेपत्ता झाला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याचा शिर नसलेला मृतदेह शहरातील डुगरी परिसरातील निर्जन ठिकाणी सापडला होता. दीपू आणि आरोपी मुलगा स्थलांतरित मजुरांची मुले असून, ते एकाच परिसरात राहत होती. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी मुलगा आठवीत शिकत आहे. दीपूची हत्या केल्यानंतर तो अगदी काही घडलेच नाही, अशा प्रकारे वावरत होता. हत्या केल्यानंतर त्याने त्याच्या वडिलांसाठी स्वयंपाकही केला. त्यावेळी त्याची आई चंदीगडमध्ये राहणाऱ्या त्याच्या मोठ्या भावाकडे गेली होती.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण पाहिले. त्यात दीपू आणि आरोपी मुलगा एकत्र दिसून आले. यावरून या घटनेचा छडा लागला. पोलिसांनी सीसीटीव्हीतील चित्रणावरून आरोपी मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे दीपूबाबत चौकशी केली असता, त्याची हत्या करून मांस खाल्ल्याची कबुली आरोपीने दिली आहे. मांस खाण्यासाठी आसुसलेल्या आरोपी मुलाने अनेकदा स्वतःचेही चावे घेतले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपी मुलगा मनोरुग्ण असल्याचा संशय पोलिसांना असून, त्याला आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पतंग देण्याच्या बहाण्याने दीपूला आपल्या सोबत नेले. त्यावेळी दीपूचे आई-वडील घरी नव्हते. सुरुवातीला आरोपी मुलाने दीपूचा गळा आवळला. त्यानंतर धारदार शस्त्राने त्याच्या शरिराचे सहा तुकडे केले. त्याचे मांस खाऊन रक्तही प्यायला. त्यानंतर त्याने मृतदेह एका पिशवीत भरून निर्जनस्थळी नेऊन टाकला. इतकेच नाही तर, दीपूचे हृदय काढून शाळेच्या आवारात फेकून दिले, अशी कबुली आरोपीने दिली आहे. शाळेतील शिक्षकांविषयी आरोपीच्या मनात प्रचंड राग होता. त्यामुळे शिक्षक आणि शाळेची बदनामी करण्यासाठी हे कृत्य केल्याची कबुली त्याने पोलिसांकडे दिली आहे.