नोटाबंदीच्या निर्णयानंतर विरोधकांकडून टीका होत असताना आता बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला आहे. सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर फिरून काळा पैसा गोळा केला. त्यानंतर त्याची व्यवस्था केली आणि देशातील जनतेची फसवणूक केली, अशी टीका राबडीदेवी यांनी आज शुक्रवारी पाटणामध्ये केली. दरम्यान, त्या बिहार विधानसभेच्या बाहेर महाआघाडीच्या नेत्यांसोबत नोटाबंदीच्या निर्णयाविरोधातील आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि हजाराच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. संसदेतही प्रचंड गदारोळ घातला आहे. त्यात आता बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांनीही पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे. काही दिवसांपूर्वीही त्यांनी मोदींवर टीका केली होती. मोदींनी काळा पैसा दडवून ठेवला आहे, असे त्या म्हणाल्या होत्या. आजही त्यांनी पाटणामध्ये बोलताना मोदी यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीच्या निर्णयाआधी देशभरात दौरे करून काळा पैसा जमा केला आणि त्यानंतर त्याची योग्य ठिकाणी व्यवस्था केली. तसेच देशातील जनतेची त्यांनी फसवणूक केली, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

यापूर्वी २९ नोव्हेंबरलाही त्यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले होते. पंतप्रधान मोदींनी काळा पैसा दडवून ठेवला आहे, असा आरोप त्यांनी केला होता. लालूजींकडे काळा पैसा नाही. २५ वर्षे खटला चालला. पण कुणी चार आणेही काढून दाखवा, असे थेट आव्हानच त्यांनी दिले होते. त्यानंतर त्यांनी नितीशकुमार आणि भाजपमधील जवळीकीवरही टीका केली होती. हवे तर नितीशकुमार यांना कडेवर घ्या, असे वादग्रस्त वक्तव्यही त्यांनी केले होते. पण नंतर सारवासारव करत मी मस्करी केली, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते. इतकेच नाही तर त्यांनी नितीशकुमारांविषयी बोलताना वादग्रस्त टिप्पणीही केली होती. नितीशकुमारांना सुशीलकुमार मोदी यांनी घेऊन जावे आणि आपल्या बहिणीशी लग्न लावून द्यावे, असे त्या म्हणाल्या होत्या.