बिहारमध्ये काँग्रेसला मिळालेल्या अनपेक्षित यशाने राहुल गांधी यांच्या काँग्रेस अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. महिनाभरातच राहुल यांच्याकडे ही जबाबदारी सोपविली जाऊ शकते, अशी शक्यता पक्षाच्या नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
गेल्या सप्टेंबर महिन्यात राहुल यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग पक्षातील काही बडय़ा नेत्यांनी रोखला होता. बिहार निवडणुकीच्या तोंडावर राहुल यांची अध्यक्षपदी निवड केली आणि पक्षाला अपयश आल्यास सारे खापर राहुल यांच्यावर फुटेल व अयशस्वी अध्यक्ष म्हणून शिक्का बसेल, असा युक्तिवाद करण्यात आला. पक्षातील नेत्यांच्या सल्ल्यानुसार पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी राहुलच्या निवडीचा निर्णय पुढे ढकलला. बिहारमध्ये मिळालेल्या यशाने काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. यातूनच राहुल यांचा लवकरच राज्याभिषेक होईल, अशी शक्यता आहे. मोदी यांच्या विरोधात राहुल आक्रमक होण्याचे संकेत आहेत. पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये केरळवगळता काँग्रेसला फार काही आशा नाहीत. यामुळेच राहुल यांच्याकडे पक्षाची सूत्रे सोपविली जातील, अशी चिन्हे आहेत.