‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी त्या संघटनेकडून भारतीय युवकांना आमिष दाखविण्याचे प्रकार वाढत चालले असल्याच्या पाश्र्वभूमीवर मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मुस्लीम धर्मगुरूंशी चर्चा केली आणि मुस्लीम युवकांना आयसिसपासून परावृत्त करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
जवळपास एक तास सुरू असलेल्या या चर्चेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल आणि गृह मंत्रालयातील ज्येष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. आयसिसच्या कारवाया आणि भारतीय युवकांना संघटनेत सहभागी करून घेण्यासाठी त्यांचे सुरू असलेले प्रयत्न या बाबत धर्मगुरूंना या वेळी माहिती देण्यात आली.
धर्मगुरूंनी या वेळी गृहमंत्र्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. समाजमाध्यमांचा गैरवापर, युवकांना आकर्षित करणारे स्रोत, शेजारी देशांत आयसिसचे वाढलेले प्रस्थ या बाबत चर्चा करण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले. आयसिसच्या प्रश्नावर मुस्लीम धर्मगुरूंशी गृहमंत्र्यांनी चर्चा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतातील अनेक भागांमधील मुले आयसिसकडे वळाल्याचे काही दिवसांमध्ये स्पष्ट झाल्यामुळे भारतात खळबळ उडाली आहे. त्यामुळे राजनाथ सिंग यांनी मुस्लिम धर्मगुरूंशी चर्चा केली.