गेल्या काही दिवसांपासून भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांना वर्णभेदाची वागणूक मिळत असल्याचे चित्र आहे. भारतीय वंशाच्या लोकांना स्थानिक रोषाला सामोरे जावे लागत आहे.  भारतीय वंशाची एक तरुणी राजप्रीत हेअर ही मेट्रो ट्रेनने प्रवास करत होती. अचानकपणे एका अमेरिकन व्यक्ती तिच्यावर ओरडायला लागली. तुझी या देशात राहण्याची लायकी नाही. आमच्या देशातून चालती हो असे तो तिला म्हणाला इतकेच नव्हे तर तू लेबनॉनला परत जा असे तो म्हणाला. त्या व्यक्तीला वाटले राजप्रीत ही लेबनॉन या देशाची नागरिक आहे. लेबनॉन हा देश मध्य आशियामध्ये आहे.

न्यूयॉर्क टाइम्सने एक नवे सदर सुरू केले आहे. ‘धिस वीक इन हेट’ या सदरामध्ये ज्या लोकांना असे कटू अनुभव आले त्याविषयी सांगितले जाते. डोनल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून अमेरिकेमध्ये वर्णद्वेषातून होणाऱ्या घटनांची वाढ झाली आहे. या घटनांची माहिती सांगणारे हे सदर न्यूयॉर्क टाइम्सने सुरू केले आहे. तुला आमच्या देशातील सैनिकांविषयी काही ठाऊक आहे का असे त्या व्यक्तीने राजप्रीतला विचारले. तुला नौसैनिक माहित आहेत का असे तो म्हणाला. तुमच्या सारख्या लोकांमुळेच आमच्या सैनिकांना प्राण गमवावे लागत आहेत असे त्या व्यक्तीने म्हटले.

तुमच्या सारख्या लोकांमुळेच त्यांना हा त्रास सहन करावा लागतो असे ते म्हणाले. माझा जन्म लेबनॉनमध्ये झाला नाही परंतु त्या व्यक्तीला माझ्या बद्दल असलेली घृणा पाहून मला अस्वस्थता वाटली असे राजप्रीतने म्हटले. माझ्या जवळच उभ्या असलेल्या एका श्वेतवर्णीय तरुणीला हा प्रसंग पाहून रडू आले असे राजप्रीतने म्हटले. गेल्या काही दिवसांपासून आपणास अशी वागणूक मिळत आहे असे तिने म्हटले. काही दिवसांपूर्वी तेलंगणाचा मूळचा रहिवासी असलेला श्रीनिवास कुचिभोतला याची एका बारमध्ये हत्या करण्यात आली. ३२ वर्षीय श्रीनिवास आणि त्याच्या मित्रावर एका माजी नौसेना अधिकाऱ्याने बंदुकीच्या गोळ्या झाडल्या. आमच्या देशातून चालता हो असे म्हणत त्याने श्रीनिवासवर गोळ्या झाडल्या. या घटनेत श्रीनिवास ठार झाला तर त्याचा मित्र जखमी झाला. श्रीनिवासला वाचवण्याचा प्रयत्न करताना एक अमेरिकन नागरिकही जखमी झाला. भारतीय वंशाच्या लोकांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे भारतीयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.