‘प्रेस काऊन्सिल ऑफ इंडिया’चे चेअरमन आणि माजी मुख्य न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी यूपीए सरकारवर केलेल्या खळबळजनक आरोपांवरून राज्यसभेत ‘एआयएडीएमके’च्या सदस्यांनी गोंधळ घातला. यामुळे सभापती हमीद अन्सारी यांना राज्यसभेचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब करावे लागले आहे.
यूपीए सरकार पडू नये म्हणून एका भ्रष्ट न्यायाधीशाचा कार्यकाळ वाढवून त्यांना मद्रास उच्चन्यायालयात बढती देण्यात आली होती, असा आरोप मार्कंडेय काटजू यांनी आपल्या ब्लॉगमध्ये केला आहे. काटजूंचे हे विधान राज्यभेत गोंधळाचे कारण ठरले आहे.
मद्रास उच्चन्यायालयाच्या एका अतिरिक्त न्यायाधीशांच्या विरोधात अनेक भ्रष्टाचाराचे आरोप होते. तरीसुद्धा त्यांना तामिळनाडूतील राजकीय वरदहस्तांनी पाठीशी घालून जिल्हा न्यायाधीश पदावरून बढती देऊन मद्रास उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश बनविण्यात आल्याचा आरोप काटजू यांनी केला आहे.