रामनाथ गोएंका स्मृती व्याख्यानमालेमध्ये राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे माध्यमे आणि जनतेला आवाहन

मुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेचे अस्तित्व नसेल तर लोकशाही फक्त एक कागदाचा तुकडा राहील, असा स्पष्ट इशारा देतानाच राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी गुरुवारी माध्यमे आणि जनता या दोघांनाही राज्यकर्त्यांना प्रश्न विचारण्याच्या मूलभूत कर्तव्याची जाणीव करून दिली. सत्तेला प्रश्न विचारण्यात कमी पडलात तर कर्तव्यात कसूर केल्यासारखे होईल, असे त्यांनी माध्यमांना निक्षून बजावले. मूठभरांच्या हातांमध्ये सारी माध्यमे एकवटणे धोकादायक असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.

एक्स्प्रेस समूहाचे संस्थापक दिवंगत रामनाथ गोएंका यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफताना राष्ट्रपती बोलत होते. पहिले पुष्प रिझव्‍‌र्ह बँकेचे तत्कालीन गव्‍‌र्हनर डॉ. रघुराम राजन यांनी गेल्या वर्षी गुंफले होते. मुखर्जी यांनी माध्यम व्यवहार आणि देशस्थिती यावर परखड भाष्य केले. यावेळी एक्स्प्रेस समूहाचे अध्यक्ष विवेक गोएंका व्यासपीठावर उपस्थित होते. कोणतेही प्रश्न न विचारता एकच प्रबळ विचारधारा किंवा दृष्टिकोन अजिबात स्वीकारता कामा नये. अंतिम मत बनविताना दुसरी पर्यायी विचारधारा किंवा दृष्टिकोन विचारात घेतला पाहिजे, असे सांगून राष्ट्रपती म्हणाले, लोकशाहीमध्ये सत्तेला प्रश्न विचारण्याचा माध्यमांचा अधिकार मूलभूत आहे. माध्यमांनी ‘वॉचडॉग’ बनले पाहिजे. जनता आणि नेते यांच्यातील संवादक बनले पाहिजे. सत्ता आणि सर्व प्रकारच्या संस्थांना जबाबदार धरतानाच माध्यमांनी सत्तेला जाब विचारण्याच्या अधिकाराबाबत जनतेमध्ये जागृतीही केली पाहिजे. दुसऱ्याचा आवाज ऐकण्याची शक्ती गमावून बसलो तर लोकशाही पराभूत होईल. सत्तेला प्रश्न विचारण्यात कमी पडली तर माध्यमे कर्तव्यांत कमी पडतील. राज्यकर्त्यांना प्रश्न विचारण्याची मूलभूत प्रवृत्ती लोकशाहीच्या आरोग्यासाठी नितांत गरजेची आहे.

‘पेड न्यूज’चा उल्लेख करताना त्यांनी माध्यमे काही मूठभरांच्या हातात जात  असल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. ‘हा प्रकार धोकादायक आहे. विश्वासार्हता वाढवून जनतेचा विश्वास संपादन करावा लागेल. ज्यावेळी मतमतांतरे खोलवर आणि तीव्र असतात, त्यावेळी तर वस्तुनिष्ठता अधिकच मोलाची ठरते. सत्याच्या वेदीवर वस्तुनिष्ठतेचा बळी देता कामा नये. इंटरनेट आणि सामाजिक माध्यमांमुळे सामान्य व्यक्तीसुद्धा स्वतच माध्यम बनला आहे. त्याचे सक्षमीकरण झाले आहे. काय वाचायचे याची निवड तो करू शकतो. त्याहीपेक्षा आपण स्वत कशावर सहमत आहोत, हे तो निवडू शकतो. पण मतभिन्नतांचा गलका माजतो, तेव्हाच माध्यमांची नेमकी आवश्यकता असते. ती भूमिका माध्यमांनी विसरता कामा नये,’ असे ते म्हणाले.

राष्ट्रपती म्हणतात..

  • आपल्याला मतभिन्नतेसह सळसळणारा देश हवा आहे की संकुचित भूमिका घेणारा, मांडणारा देश हवा आहे? अतिशय गुंतागुंतीच्या विषयांकडे संकुचित नजरांतून पाहणार असू तर त्यातून समाजात ध्रुवीकरण होत राहील.
  • सहिष्णुता आणि दुसऱ्याला समजून घेण्याच्या भावनेने आपल्याला भारतीय बनविले आहे. संवाद साधू पाहणाऱ्यांना, मुद्द्यांवरून वाद घालू पाहणाऱ्यांना मोकळे अवकाश आहे; पण असहिष्णु असणाऱ्यांसाठी अजिबात जागा नाही.
  • वाद आणि संवाद आपल्या सळसळत्या लोकशाहीसाठी अत्यावश्यक आहे. भाषिक विविधता ही आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीचा कणा आहे.

 ‘रामनाथ गोएंकांची तत्त्वे आजही तितकीच लागू

एक्स्प्रेस समूहाचे संस्थापक दिवंगत रामनाथ गोएंका यांच्या स्मृतींना राष्ट्रपतींनी यावेळी आवर्जून उजाळा दिला. आणीबाणीच्या कालावधीत ‘इंडियन एक्स्प्रेस’ने रिकामी ठेवलेली संपादकीय जागा माध्यमांवरील र्निबधांचा आजवरचा सर्वाधिक तीव्र निषेध असेल. या निषेधासाठी दुसरे शब्दच नाहीत, असे सांगून ते म्हणाले, ‘मुक्त आणि स्वतंत्र माध्यमांअभावी लोकशाही फक्त एक कागदाचा तुकडा राहील. रामनाथ गोएंका यांचे विचार दगडांमध्ये कोरून ठेवले पाहिजे आणि लोकशाही व स्वातंत्र्यावर श्रद्धा असलेल्या सर्व पत्रकारांनी त्याचे अनुकरण केले पाहिजे. विवेक गोएंका यांच्या नेतृत्वाखालीही ‘इंडियन एक्स्प्रेस’ने जपलेले सत्व, सत्याची करत असलेली पाठराखण पाहून मला आनंद आहे. किंबहुना रामनाथ गोएंका यांची तत्त्वे तेव्हाही आणि आताही तितकीच लागू पडतात.