पाकिस्तानचे समर्थन करणारे वक्तव्य केल्यामुळे अडचणीत सापडलेल्या काँग्रेस नेत्या  दिव्या स्पंदन उर्फ रम्या यांच्या गाडीवर आंदोलकांनी  गुरुवारी अंडी फेकली. कर्नाटकमधील मंगलूरहून रम्या यांच्या गाडीचा ताफ जात असताना पाकचे समर्थन केल्याप्रकरणी आंदोलकांनी त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. आपला विरोध व्यक्त करण्यासाठी आदोलंकांनी त्यांच्या गाडीवर निशाणा साधला. पाकिस्तानचे समर्थन करणारे वक्तव्य केल्याबद्दल कन्नड अभिनेत्री दिव्या स्पंदन उर्फ रम्या यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आहे. भारताच्या स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानकडून झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पाकिस्तानची तुलना नरकाशी केली होती. मात्र, रम्याने आपण पर्रिकर यांच्या विधानाशी सहमत नसल्याचे म्हटले होते. पाकिस्तान हा नरक नसून एक चांगला देश आहे. पर्रिकर यांचे विधान चुकीचे आहे. पाकिस्तानमधील नागरिकही आपल्यासारखेच आहेत. मी भारतातून आले आहे, हे समजल्यानंतर त्यांनी खूप चांगल्याप्रकारे माझे आदरातिथ्य केल्याचे रम्या यांनी म्हटले होते. या विधानानंतर त्यांच्यावर टीकेला सुरूवात झाली होती. पर्रिकरांच्या वक्तव्यावर भाष्य केल्यानंतर त्यांच्यावर टीकेला सुरूवात झाली.