रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अनिवासी भारतीयांना नोटा बदलून घेण्याच्या मुदतीत वाढ केली आहे. मात्र ही मुदतवाढ ९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान परदेशात असणाऱ्या अनिवासी भारतीयांसाठीच लागू असेल. ९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान परदेशात असणारे अनिवासी भारतीय ३० जून २०१७ पर्यंत त्यांच्याकडे असणाऱ्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलू शकतात. मात्र ही मुदतवाढ नेपाळ, भूटान, पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये असणाऱ्या भारतीय नागरिकांना लागू असणार नाही. सध्याच्या नियमानुसार अनिवासी भारतीयांना त्यांच्यासोबत २५ हजार रुपये नेण्याची मुभा आहे.

‘नोटाबंदीची घोषणा झाल्यानंतर म्हणजेच ९ नोव्हेंबरपासून ३० डिसेंबरपर्यंत भारताबाहेर असणारे भारतीय नागरिक ३१ मार्च २०१७ पर्यंत त्यांच्याकडे असणाऱ्या जुन्या नोटा बदलू शकतात. तर ९ नोव्हेंबरपासून ३० डिसेंबरपर्यंत भारताबाहेर असणारे अनिवासी भारतीय त्यांच्याकडे असणाऱ्या जुन्या नोटा ३० जून २०१७ पर्यंत बदलू शकतात,’ असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सांगण्यात आले आहे.

‘भारतीय नागरिक असणाऱ्या लोकांसाठी नोटा बदलून घेण्यासाठी कोणतीही मर्यादा असणार नाही. या व्यक्ती त्यांच्याकडे असणाऱ्या सर्व जुन्या नोटा बदलून घेऊ शकतात. मात्र अनिवासी भारतीयांना ही सूट नसेल. त्यांना फेमा कायद्यांतर्गत जुन्या नोटा बदलून दिल्या जातील,’ असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेच्या नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता आणि नागपूरमधील कार्यालयांमध्ये जुन्या नोटा बदलून दिल्या जाणार आहेत.

‘आधार नंबर, पॅन कार्डसारख्या कागदपत्रांसोबत ९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान भारताबाहेर असल्याची कागदपत्रे सादर करुन नोटा बदलून घेता येतील. यासोबतच सीमाशुल्क विभागाचे प्रमाणपत्रासह दरम्यानच्या काळात नोटा बदलून घेतल्या नसल्याची कागदपत्रेदेखील सादर करावी लागतील. भारताबाहेर असणाऱ्या व्यक्तींनाच यासाठी रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयांमध्ये नोटा बदलता येतील. त्यांच्या वतीने येणाऱ्या व्यक्तींना नोटा बदलून दिल्या जाणार नाहीत,’ असेदेखील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे.

यासोबत एटीएममधील रोख रक्कम काढण्याच्या मर्यादेतदेखील रिझर्व्ह बँकेकडून वाढ करण्यात आली आहे. याआधी एका दिवसाकाठी लोकांना अडीच हजार रुपये एका बँक खात्यातून काढता येत होते. आता ही मर्यादा साडे चार हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र आठवड्यासाठी असलेली रोख रक्कम काढण्याबद्दलच्या मर्यादेत वाढ करण्यात आलेली नाही. ३० डिसेंबरपर्यंत लोकांना त्यांच्याकडे असणाऱ्या पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा बँकेतून बदलून घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. ही मुदत आता संपुष्टात आली आहे.

८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. यानंतर पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा चलनातून रद्द झाल्या. या नोटा बदलून घेण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंतचा कालावधी देण्यात आला होता.