भारत आणि चीन या दोन्ही देशांनी आपसात चर्चा करून त्यांच्यातला सीमा प्रश्न मार्गी लावावा असा सल्ला अमेरिकेनं दिला आहे. भारत आणि चीन यांच्यातला तणाव कमी करण्यासाठी या दोन्ही देशाच्या प्रतिनिधींनी समोरासमोर येऊन आपली भूमिका मांडली पाहिजे, यामध्ये कोणतीही सक्ती किंवा दबाव नको असं अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्या गेरी रोस यांनी म्हटलं आहे. थेट चर्चा करून या दोन्ही देशांनी तणाव निवळेल असं वातावरण तयार केलं पाहिजे यातच दोन्ही देशांचं हित आहे असंही रोस यांनी स्पष्ट केलं आहे.

डोक्लाममध्ये चीनच्या लष्करानं घुसखोरी केल्यापासून भारत आणि चीन यांच्यातला सीमा प्रश्न चिघळला आहे. आता चीननं याप्रश्नी आक्रमक भूमिका घेत भारताविरोधात लढाई पुकारू असंही म्हटलं आहे, या सगळ्यानंतर अमेरिकेनं लढाई हे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नसून दोन्ही देशांनी चर्चेनं हा प्रश्न सोडवावा असं म्हटलं आहे. संसदेत भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी चीननं घुसखोरी केली असून त्यांनी सैन्य मागे घ्यावं असं म्हटलं होतं. ज्यानंतर सुषमा स्वराज खोटारड्या असल्याची टीका चीननं केली होती आणि डोक्लाम हा आमच्याच राष्ट्राचा भाग आहे असंही स्पष्ट केलं होतं.

तसंच भारतानं आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये असं झालं तर युद्ध अटळ आहे असाही इशारा ग्लोबल टाइम्सच्या लेखात देण्यात आला होता. आता यानंतर अमेरिकेनं या प्रश्नी लक्ष घातलं असून चर्चा करून हा प्रश्न सोडवावा असं म्हटलं आहे. या सगळ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल पेइचिंगमध्ये ब्रिक्स देशांच्या बैठकीसाठी जाणार आहेत. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ब्रिक्स देशांची बैठक होणार आहे या बैठकीत भारत आणि चीन यांच्यातल्या तणावासंदर्भात चर्चा होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून चीन आणि भारत या दोन्ही देशांमध्ये सीमा प्रश्नावरून मोठा वाद निर्माण झालेला बघायला मिळतो आहे. डोक्लाम प्रश्नी सुषमा स्वराज यांनी कठोर भूमिका घेतल्याचं सांगताच आता चीननं युद्धाची भाषा सुरू केली आहे. तसंच चीनकडून पाकिस्तानलाही आर्थिक रसद पुरवली जाते आहे. त्यामुळे चीनचे मनसुबे काय आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही. आता अमेरिकेनं जरी चर्चा करून हा प्रश्न सोडवा असं म्हटलं असलं तरीही या दोन्ही देशांमधला हा ऐरणीवर आलेला प्रश्न चर्चेनं सुटणार का? हा पेच अद्यापही कायम आहे.