कॉर्पोरेट कंपन्यांच्या सहवेदना (Empathy) आढावा घेणारा एक अहवाल समोर आला आहे. उत्पादनांचा दर्जा, कंपन्यांमधील वातावरण, कामगारांना मिळणाऱ्या सुविधा, नैतिक मूल्ये यांच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालात जगप्रसिद्ध सोशल साईट असणाऱ्या फेसबुकने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर भारताच्या अनेक कंपन्या फारशा सहवेदना दाखवणाऱ्या नसल्याचे हा अहवाल सांगतो आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील देशातील मोठी कंपनी असणारी भारत पेट्रोलियम या यादीत शेवटच्या स्थानावर आहे.

कॉर्पोरेट कंपन्यांचा सहवेदनशीलतेचा निर्देशांक सांगणाऱया अहवालात कंपन्यांच्या उलाढालीबरोबरच त्यांनी उत्पादनांचा दर्जा सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न, जपलेली मूल्ये यांचादेखील विचार करण्यात आला आहे. चांगल्या लोकांना संधी, त्यांना काम करण्यासाठी अनुकूल वातावरण आणि उत्पादनांची गुणवत्ता या आधारे चांगल्या कंपन्यांची यादी तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या यादीतील पहिल्या पाच कंपन्यांपैकी चार कंपन्या या तंत्रज्ञान क्षेत्रातील आहे. यामध्ये फेसबुक अव्वल स्थानी आहे. त्यानंतर अल्फाबेट (गुगल) दुसऱ्या, लिंक्डइन तिसऱ्या तर नेटफ्लिक्स चौथ्या क्रमांकावर आहे. युनिलिव्हर कंपनीने या यादीत पाचवे स्थान मिळवले आहे.

w161116_parmar_twentymost-1-850x941

सहवेदनशीलपणा जपणाऱ्या कंपन्यांच्या यादीत साऊथवेस्ट एअरलाईन्स सहाव्या तर तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य कंपनी असलेली मायक्रोसॉफ्ट सातव्या क्रमांकावर आहे. याशिवाय जॉन्सन एँड जॉन्सन, स्टारबक्स, ऍपल, बीएमडब्ल्यू, ब्लॅकस्टोन, नायके या कंपन्यांनीदेखील या यादीत पहिल्या टॉप २० मध्ये स्थान मिळवले आहे.

भारतीय कंपन्यांची कामगिरी मात्र फारशी चांगली नसल्याचे या अहवालातून समोर आले आहे. भारत पेट्रोलियम ही देशातील मोठी कंपनी या यादीत अगदी तळाला आहे. याशिवाय भारती एअरटेल या यादीत शेवटून पाचव्या क्रमांकावर आहे. इंडियन ऑईल, स्टेट बँक ऑफ इंडिया, रिलायन्स या कंपन्यांचा समावेश शेवटच्या २० कंपन्यांमध्ये झाला आहे. याशिवाय लार्सन एॅण्ड टुब्रो, आयसीआयसीआय बँक, असोशिएटड ब्रिटिश फूड्स, ब्रिटिश एअरवेज, लेनोवो या कंपन्यांची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही.