दोनशे रुपयांची नवीन नोट आणल्यानंतर आता केंद्र सरकारने शंभर रुपयांचे नाणे चलनात आणण्याचा निर्णय घेतला आहे. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि ‘अण्णाद्रमुक’ पक्षाचे संस्थापक एम. जी रामचंद्रन यांच्या जन्मशताब्दी निमित्त सरकारने शंभर आणि पाच रुपयाचे नवे नाणे आणण्याची घोषणा केली.

आर्थिक व्यवहार आणखी सुलभ करण्यावर केंद्र सरकारने भर दिला आहे.  एम.जी. रामचंद्रन यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त केंद्र सरकारने शंभर आणि पाच रुपयांचे नवे नाणे आणण्याचा निर्णय घेतला आहे. यातील शंभर रुपयाच्या नाण्याचे वजन ३५ ग्रॅम तर ५ रुपयाच्या नाण्याचे वजन ५ ग्रॅम असेल. नाण्यात ५० टक्के चांदी, ४० टक्के कॉपर, ५ टक्के निकेल आणि ५ टक्के झिंक या धातूंचा वापर करण्यात येईल. सध्या बाजारात १,२, ५ आणि १० रुपयांची नाणी चलनात आहेत. आगामी काळात यात १०० रुपयाच्या नाण्याची भर पडणार आहे.

एम. जी. रामचंद्रन (एमजीआर) यांनी १९७२ मध्ये ‘द्रविड मुन्नेतत्र कळघम’ (द्रमुक) या पक्षातून फुटून अ. भा. अण्णाद्रविड मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके) या पक्षाची स्थापना केली होती. एमजीआर यांनी १९७७, १९८० तसेच १९८४ मध्ये  मुख्यमंत्रिपद भूषवले होते. १९८९मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

काही दिवसांपूर्वी आरबीआयने २०० रुपयाची नोट चलनात आणली होती. गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. यानंतर पाचशे आणि एक हजार रुपयाची नोट चलनातून बाद झाली आणि त्याऐवजी पाचशे आणि दोन हजार रुपयाची नोट चलनात आली होती.