राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून माकपमध्ये काहीच दिवसांपूर्वी प्रवेश केलेल्या तिरुअनंतपुरममधील नेते पी. पद्मकुमार यांनी पुन्हा संघात प्रवेश केला आहे. माकपमध्ये ‘आयएस’ या संघटनेतील दहशतवाद्यांमध्ये राहिल्यासारखे वाटले, असे खळबळजनक वक्तव्य पद्मकुमार यांनी केले आहे.

संघ परिवारात चार दशके असलेले ‘हिंदू ऐक्य वेदी’चे पूर्व प्रांताचे सचिव पद्मकुमार यांनी २७ नोव्हेंबरला माकपमध्ये प्रवेश केला होता. संघाविरोधातील नाराजीमुळे त्यांनी संघटनेला रामराम करून माकपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, चार दिवस उलटत नाही तोच त्यांनी घरवापसी केली आहे. पुन्हा एकदा संघात प्रवेश करत माकपवर तोफ डागली आहे. गुरुवारी संध्याकाळी त्यांनी युवा मोर्चातर्फे आयोजित केलेल्या एका बैठकीत संघात परतण्याबाबत घोषणा केली. ते म्हणाले, की ‘माकपमध्ये राहणे म्हणजे आयएसच्या दहशतवाद्यांसोबत एखाद्या राष्ट्रवादी व्यक्तीला पकडल्यासारखे वाटले.’ २७ नोव्हेंबरला झालेल्या पत्रकार परिषदेत माकपच्या नेत्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात त्यांचे विचार नमूद केले नव्हते, असा दावाही पद्मकुमार यांनी यावेळी केला.

दरम्यान, माकपमध्ये प्रवेश करताना पद्मकुमार यांनी संघावर, संघटेनेच्या कार्यशैलीवर टीका केली होती. तेथील अमानवी वागणूक, राजकारण आदींविरोधात असल्याचे पद्मकुमार यांनी सांगितले होते. तसेच नुकत्याच घेण्यात आलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर अखेर संघाला रामराम करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले होते.