केंद्रातील मोदी सरकारवर विरोधकांच्या जोडीने आता स्वकीय देखील टीका करू लागले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या भारतीय मजदूर संघाच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱयाने मोदींच्या कार्यशैलीवर शंका उपस्थित करत सरकारला घरचा आहेर देऊ केला. मोदी सरकार देशातील कामगारांसाठी काहीच करत नसल्याचा आरोप करत मोदींना गरिबीचा अर्थ माहित नसल्याची टीका भारतीय मजदूर संघाचे सचिव के.सी.मिश्रा यांनी केली आहे. कामगारांच्या जनकल्याणासाठी काही करता येत नसेल तर निदान त्यांना जे मिळाले आहे ते तरी हिसकावून घेऊ नका, अशा शेलक्या शब्दांत मिश्रा यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. मोदींना गरिबीचा खरा अर्थ अजून समजलेला नसून त्यांनी देशाच्या पूर्वेकडील राज्यांत फेरफटका मारावा आणि गरिबी समजून घ्यावी, असा सल्ला देखील मिश्रा यांनी मोदींना देऊ केला. मिश्रा हे संघाच्या 22 ज्येष्ठ प्रचारकांपैकी एक राहिले असून त्यांना भारतीय मजदूर संघाच्या सचिवपदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी संवाद साधताना मिश्रा यांनी गेल्या वर्षभरात मोदी सरकारने कामगारांशी संबंधित घेतलेल्या विविध निर्णयांवर भाष्य केले. ते म्हणाले की, कामगारांच्या कल्याणासाठी काही करता येत नसेल तर निदान कामगारांनी कमाविलेल्या आयुष्यभराची कमाई हिसकावून घेतली जाईल असे कायदे त्यांनी करू नयेत. आम्ही नेहमी भाजपला मतदान करत आलो. पण खरे पाहता भाजप सरकारच्या काळात काम करणे अतिशय कठीण जात आहे. मनमोहन सिंग यांच्या सरकारवर निदान काही प्रमाणात वचक तरी ठेवता येत होता मात्र मोदी सरकारचे मंत्री तर बोलायला देखील तयार नाहीत. मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून आजवर अनेकवेळा आम्ही कामगारांच्या समस्या पत्र स्वरूपात त्यांना पाठवत आलो आहोत. अद्याप एकदाही मोदी सरकारची प्रतिक्रिया आलेली नाही, असेही ते म्हणाले.