उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये मंगळवारी संध्याकाळी उफाळलेल्या जातीय हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला आहे. तर १५ जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या आदेशानंतर गृहसचिव मणिप्रसाद मिश्रा, आदित्य मिश्रा, अमिताभ यश आणि पोलीस महासंचालक विजय भूषण यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सहारनपूरमध्ये ठाण मांडून बसले आहेत. दुसरीकडे राज्य सरकारतर्फे मृताच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

हिंसाचाराच्या घटनेनंतर पोलीस आणि स्थानिक प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी मंगळवारी रात्रीच सहारनपूरमध्ये पोहोचले. त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. सर्व अधिकाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केलेल्या जखमींची विचारपूस केली. दरम्यान, हिंसाचारानंतर सहारनपूरमध्ये परिस्थिती तणावपूर्ण आहे. या प्रकरणी आतापर्यंत २४ जणांना अटक करण्यात आली आहे. तर १० जणांची चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक सुभाषचंद्र दुबे यांनी दिली. तर एका व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणात तिघांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या घटनेत १५ जण जखमी झाले असून, त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे बसप प्रमुख मायावती यांच्या रॅलीनंतर सहारनपूरमध्ये हिंसाचाराची घटना घडली आहे.

या घटनेनंतर राज्य सरकारने गृहमंत्रालयाला अहवाल पाठवला आहे. त्यात २३ मे रोजी मायावती यांच्या रॅलीवरून परतणाऱ्या लोकांवर ठाकूर समुदायाच्या काही लोकांनी हल्ला चढवला. त्यात एका दलित तरुणाचा मृत्यू झाला. तर १५ जण जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तर एक दलित तरुण बेशुद्धावस्थेत शब्बीरपूर गावाजवळ सापडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. या हल्ल्यानंतर दलितांनीही दगडफेक केली, असेही त्यात सांगण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेनंतर योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.