बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला २००२ मधील वाहनाने धडक देऊन फरार होण्याच्या घटनेत (हिट अँड रन केस) मंजूर केलेला जामीन रद्द करण्याच्या मागणीवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. याबाबत एक याचिका सादर करण्यात आली होती.
सरन्यायाधीश एच.एल.दत्तू  व न्या. अमिताव रॉय यांनी सांगितले की, या याचिकेवर आम्ही सुनावणी करणार नाही त्यामुळे ती मागे घेण्यात यावी.
न्यायालयाने म्हटले आहे की, सुशीला हिंमतराव पाटील यांनी वकील मनोहरलाल शर्मा यांच्यामार्फत सलमान खानला मंजूर केलेला जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी याचिकेद्वारे केली होती. त्याला कनिष्ठ न्यायालयाने दिलेली पाच वर्षांची शिक्षा वाढवावी अशीही मागणी याचिकेत केली होती.
२७ जुलैला सर्वोच्च न्यायालयाने पाटील यांची एक याचिका फेटाळली होती. त्यात त्यांनी सलमान खान याने त्याला दोषी ठरवण्याच्या आदेशावर केलेले अपील मुंबई उच्च न्यायालयाबाहेर सुनावणीस
घेण्याची मागणी केली होती. ६ मे रोजी सलमान खानला सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली पाच वर्षे तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती,
पण नंतर ८ मे रोजी मुंबई उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता.