सशस्त्र दरोडेखोरांनी एचडीएफसी बँकेच्या वाहनातून १४ लाख रुपये लुटण्याचा केलेला प्रयत्न  सुरक्षा रक्षकाने हाणून पाडला परंतु त्यात या रक्षकाने हल्लेखोरांच्या गोळीबारात प्राण गमावले, बिहारमधील सारण जिल्ह्य़ात ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
 मोटर सायकलवर आलेल्या दरोडेखोरांनी एचडीएफसी बँकेची पैसे नेणारे वाहन अडवून १४ लाख रुपये लुटण्याचा प्रयत्न केला. हे पैसे एटीएममध्ये भरणा करण्यासाठी नेले जात होते. सुरक्षा रक्षक शाहराम मिया (वय ४०)  याने दडोडेखोरांना कसून विरोध केला. दरोडेखोरांनी पळून जाण्याच्या अगोदर या सुरक्षा रक्षकावर गोळीबार केला.
त्याला जखमी अवस्थेत सरकारी रुग्णालयात दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले, असे पोलीस अधिकारी गणेश ठाकूर यांनी सांगितले. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलीस प्रयत्नशील असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर बँकेच्या शाखेभोवती बंदोबस्तात वाढ करण्यात आली.