निश्चलनीकरणानंतर सर्वाधिक मोठा फटका भारतातील सेवा क्षेत्राला बसल्याचे मार्किट इकोनॉमिक्स या संस्थेनी सांगितले आहे. द निक्की इंडिया सर्व्हिस बिजनेस अॅक्टिविटी इंडेक्स किंवा निक्की भारतीय सेवा क्षेत्र निर्देशांकात घसरण झाल्याचे या संस्थेनी एका प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

निक्की सेवा क्षेत्र निर्देशांक ५४.५ वरुन घसरुन ४६.७ वर आला आहे.  गेल्या सतरा महिन्यातील ही पहिलीच घसरण आहे तर गेल्या तीन वर्षातील ही सर्वात मोठी घसरण असल्याचे मार्किटने म्हटले आहे. जर हा निर्देशांक ५० च्या वर असेल तर त्याचा अर्थ हे क्षेत्र विस्तारत आहे असा होतो तर ५० च्या खाली आल्यास हे क्षेत्र आकुंचन पावत असल्याचे निदर्शक असते.

बाजारात नगदी व्यवहार होत नसल्यामुळे सेवा क्षेत्राला मोठे नुकसान झाले आहे. मध्यस्थीने चालणारे व्यवहार, हॉटेल आणि रेस्टोरंट्स, भाड्याने वस्तू किंवा घर देणे तसेच छोटे व्यवसाय यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.

सरकारने ५०० आणि १००० च्या नोटा बंद केल्या. या नोटांचे अर्थव्यवस्थेतील प्रमाण ८६ टक्के होते. त्यामुळे हातातील खेळता पैसा अचानक थांबल्यामुळे लोकांची क्रयशक्ती कमी झाली आहे. वस्तू आणि सेवांवर ज्या प्रमाणात पैसा खर्च केला जात असे तो थांबल्यामुळे या क्षेत्रात घसरण झाली आहे.

सेवा क्षेत्राचा जीडीपीमधील वाटा ६० टक्के आहे. त्यामुळे या क्षेत्रावर तणाव पडल्यास भारताच्या आर्थिक वृद्धीवर नकारात्मक परिणाम होईल. भारताचा चालू आर्थिक दर ७.३ टक्के आहे. त्यामध्ये घसरण होणार असल्याचे भाकीत अर्थतज्ज्ञांनी केले आहे.

नवीन व्यवसायांमध्ये २०१५ पासून सुरू पहिल्यांदाच घसरण नोंदविण्यात आली आहे. असे असले तरी ही घसरण काही काळापुरतीच असल्याचे मार्किटच्या अर्थतज्ज्ञ पॉलियाना डी लीमा यांनी म्हटले आहे. एकदा का नव्या नोटा चलनात परतल्या तर ही स्थिती पूर्ववत होईल असे म्हटले आहे.