सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अभिनेता शाहरुख खानला ‘रेड चिलीज’ कंपनीच्या शेअर व्यवहारावरुन २३ ऑगस्टला ‘ईडी’च्या कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावली होती. परकीय चलन कायद्याचे उल्लंघन (FEMA)केल्याप्रकरणी चौकशीस सामोरे जाण्याची तयारी दाखवत शाहरुखने चार आठवड्यांची मुदत ईडीकडे मागितली. ईडीने त्याला ही मुदत वाढवून दिली आहे. आता २० सप्टेंबर रोजी शाहरुख ईडीच्या कार्यालयात हजर राहणार असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

इंडियन प्रीमिअर लीगमधील(आयपीएल) कोलकाता नाईट रायडर्स संघाचे संघमालक अभिनेता शाहरुख खान, त्याची पत्नी गौरी खान आणि अभिनेत्री जुही चावला यांना याआधी ईडीने कारणे द्या नोटीस बजावली होती.

२००८ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स स्पोर्टस् प्रा. लि. आणि जय मेहता यांच्या मालकीची ‘सी आईसलँड इन्व्हेस्टमेंट’ या कंपन्यांमध्ये शेअर खरेदी-विक्री व्यवहार झाला होता. त्यावेळी केकेआरने ६०-७० रुपयांचे शेअर जय मेहतांना अवघ्या ६ ते ७ रुपयांना विकले होते. हे शेअर्स विकताना प्रत्येक शेअरची किंमत आठ ते नऊपटीने कमी करण्यात आली होती. या प्रकरणी ७३.६ कोटींच्या व्यवहारात शाहरुखने परकीय चलन नियमांचा भंग केल्याचे ईडीने केलेल्या मूल्यांकन अहवालात स्पष्ट झाले. त्यामुळे या व्यवहाराबाबत आक्षेप नोंदविण्यात आला होता.