अद्रमुकच्या नेत्या व्ही. के. शशिकला यांची दोन कोटी रुपये लाच घेऊन येथील मध्यवर्ती तुरुंगात बडदास्त ठेवण्याचा आरोप करणाऱ्या पोलिस उपमहानिरीक्षक डी. रूपा तसेच पोलिस महासंचालक (तुरुंग) एच. एन. सत्यनारायण राव या दोघांचीही बदली करण्यात आली आहे. रूपा व सत्यनारायण यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची आतषबाजी झाली होती. त्यानंतर कर्नाटक सरकारने दोघांवरही कारवाई केली आहे.

राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशात म्हटले आहे, की एन. ए. मेघारीख यांची राव यांच्या जागी अतिरिक्त पोलिस महासंचालक (तुरुंग) या पदावर नेमणूक करण्यात आली आहे.

रूपा यांची बदली कुठल्या पदावर करण्यात आली हे समजलेले नाही, त्यांच्या जागी कुणाची नेमणूक केली हेही स्पष्ट झालेले नाही. रूपा या पोलिस उपमहानिरीक्षक (तुरुंग) या पदावर काम करीत होते. १२ जुलैला रूपा यांनी पोलिस महासंचालक राव यांना सादर केलेल्या अहवालात असे म्हटले होते, की शशिकला यांची तुरुंगात बडदास्त ठेवण्यासाठी दोन कोटी रुपये लाच देण्यात आल्याची चर्चा आहे.

राव यांनी हा आरोप फेटाळला होता. शशिकला यांना नियमांचे उल्लंघन करून खास स्वयंपाकघराची व्यवस्था करून दिली असल्याचेही अहवालात म्हटले होते.

शशिकला यांना पारपाना अग्रहरा मध्यवर्ती तुरुंगात ठेवले आहे. फेब्रुवारीत त्यांना बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी त्यांचे नातेवाईक व्ही. एन. सुधाकरन व इलावारसी यांच्यासह दोषी ठरवण्यात आले होते. त्यांना चार वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. पोलिस महासंचालक राव यांनी रूपा यांनी केलेले आरोप चुकीचे व निराधार असल्याचे म्हटले होते. रूपा यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. रूपा यांनी या बाबत सत्यशोधन समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नंतर या आरोपांची चौकशी करण्यासाठी निवृत्त आयएएस अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची घोषणा केली असून दोषींवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

काँग्रेस सरकारने याबाबत रूपा यांना नोटीस दिली असून, त्यांचे वर्तन नियमबाहय़ असल्याचे म्हटले होते. रूपा यांनी त्यांच्या अहवालात मुद्रांक घोटाळय़ातील आरोपी अब्दुल करीम तेलगी यालाही तुरुंगात खास वागणूक दिली जात असल्याचेही म्हटले होते.