नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीपासून सातत्याने पराभवाला सामोरे जात असलेल्या काँग्रेसने आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी कंबर कसली असून, पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या तयारीला आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसने निवडणुकीच्या आधीच उत्तर प्रदेशमधील पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला आहे. त्यासाठी पक्षाने दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांची निवड केली असून, त्यांच्याकडे या निवडणुकीचे नेतृत्त्व करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पक्षाकडून गुरुवारी अधिकृतपणे याबाबत घोषणा करण्यात आली.
शीला दीक्षित यांची राजकीय कारकीर्द मोठी असून, आतापर्यंत त्यांनी केंद्रात मंत्रिपद सांभाळले असून, सलग १५ वर्षे त्या दिल्लीच्या मुख्यमंत्रीही राहिल्या आहेत. गांधी घराण्याशी असलेली जवळीक, प्रशासनावर असलेली पकड आणि वेगाने काम करण्याच्या पद्धतीमुळे शीला दीक्षित यांची वेगळी प्रतिमा होती. पण राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा त्याचबरोबर २०१२ मध्ये दिल्लीत धावत्या बसमध्ये तरुणीवर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या प्रकारानंतर शीला दीक्षित यांच्या कार्यपद्धतीवर डाग लागला. त्यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येऊ लागली. त्यातच अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचा उदय होऊन त्यांनी थेट शीला दीक्षित यांच्याच विरोधात आघाडी उघडली. चोहोबाजूंनी शीला दीक्षित यांच्यावर टीका होऊ लागल्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांना लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. केजरीवाल यांनीच शीला दीक्षित यांचा पराभव केला. त्यानंतर शीला दीक्षित हे नाव दिल्लीच्या राजकीय पटलावरून बाजूला पडले.
उत्तर प्रदेशमधील निवडणुकीसाठी काँग्रेसची रणनिती ठरविण्याचे काम पक्षाने प्रशांत किशोर यांच्याकडे दिले आहे. त्यांनीच उत्तर प्रदेशात काँग्रेसने बाह्मण उमेदवाराला मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी द्यावी, असा सल्ला पक्षाला दिला आहे. त्यामुळे शीला दीक्षित यांना उमेदवारी दिली जाणार, अशा चर्चांना दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरुवात झाली होती. अखेर ती खरी ठरली. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसने उत्तर प्रदेशात राज बब्बर यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपविले. त्यावेळीही अनेकांनी आश्यर्य व्यक्त केले होते.