एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण करणारे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी त्यांच्या कृत्याबद्दल माफी मागण्यास नकार दिला आहे. एअर इंडियाने खासदार गायकवाड यांना काळ्या यादीत टाकले आहे. मात्र तरीही ‘माझ्याकडे तिकीट असल्याने ते मला काळ्या यादीत टाकू शकत नाहीत. मी संध्याकाळी दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या विमानातून प्रवास करणार आहे,’ असे थेट आव्हान खासदार गायकवाड यांनी दिले आहे. दरम्यान एअर इंडियाने रवींद्र गायकवाड यांचे आज संध्याकाळचे तिकीट रद्द केले आहे. तर देशातील सर्वच एअरलाईन्सने गायकवाड यांच्यावर बंदी घातली आहे.

‘मी काहीही चुकीचे केलेले नाही. त्यांनी माझ्याशी गैरवर्तन केले आहे,’ असे रवींद्र गायकवाड यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले. एअर इंडियाने माझ्याविरोधात कारवाई करुन दाखवावी, असे आव्हान गायकवाड यांनी दिले आहे. ‘त्यांनी कारवाई करावी. त्यांनी न्यायालयात जाऊन खटला दाखल करावा. मी दंड भरण्यास तयार आहे,’ असे गायकवाड यांनी म्हटले. यावेळी बोलताना पक्षाकडून समन्स बजावण्यात आल्याची माहिती गायकवाड यांनी दिली. ‘माझ्यावर काय कारवाई घ्यायची, ते उद्धव ठाकरे ठरवतील. मला पक्षाच्या कार्यालयात बोलवण्यात आले आहे,’ असे गायकवाड यांनी म्हटले.

एअरलाईन असोसिएशनकडून रवींद्र गायकवाड यांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. एअर इंडियाकडूनदेखील संबंधित प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. ‘आम्ही संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती तयार केली आहे,’ अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. खासदार रवींद्र गायकवाड यांनी काल (गुरुवारी) एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारल्याची माहिती दिली.